ट्रक चालकांचा संप; एपीएमसी बाजारात परराज्यातील भाजीपाला आवक कमी

दरात ३० ते ३५ टक्के वाढ
वाशी : नवीन हिट अँड रन कायद्यातील तरतूदींची अंमलबजावणी तूर्तास लांबणीवर पडली आहे. या कायद्याबाबत केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केल्याने वाहतुकदारांनी २ जानेवारी रोजी रात्री संप मागे घेतल्याचे उशिरा जाहीर केले. दरम्यान, ट्रकचालकांच्या संपाचा फटका वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) भाजीपाला मार्केटला बसला आहे. १ ते २ जानवेारी या दोन दिवसात परराज्यातील भाजीपाला आवक २० ते २५ टक्क्यांनी घटली आहे. परिणामी  भाजीपाला दरात ३० ते ३५ टक्के वाढ झाली आहे.

केंद्र सरकारच्या नवीन ‘हिट अँड रन ' कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी तीव्र विरोध करत १ जानेवारी पासून काम बंद आंदोलन पुकारले होते. ट्रक चालकांच्या या आंदोलनाला यश आले. ट्रक चालक संघटना आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीत तूर्तास ‘हिट अँड रन' या कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला. ट्रक चालकांनी या निर्णयाचे स्वागत करत संप २ जानेवारी रोजी रात्री उशिरा मागे घेतला. मात्र, केंद्र सरकारने निर्णय उशिराने घेतल्याने परराज्यातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा भाजीपाला एपीएमसी भाजीपाला बाजारात पाठवला नसल्याने भाजीपाला आवक मोठ्या प्रमाणावर घसरली.

एपीएमसी भाजीपाला बाजारात ३० डिसेंबर २०२३ रोजी ७७९ गाड्यांतून भाजीपाला दाखल झाला होता. तर १ जानेवारी रोजी ६६५ गाड्या भाजीपाला दाखल झाला होता. मात्र, १ जानेवारी पासून ट्रक चालकांच्या आंदोलनाने जोर धरल्याने २ जानेवारी एपीएमसी भाजीपाला बाजारात आवक घटून ६४२ वाहनांवर आली. ट्रक बंद आंदालेन सुरुच राहणार म्हणून परराज्यातील शेतकऱ्यांनी १ जानेवारी पासूनच खबरदारी घेत भाजीपाला गाड्या पाठवल्या नाहीत. परिणामी २ जानेवारी रोजी एपीएमसी भाजीपाला बाजारात भाजीपाला आवक कमी आली. दुसरीकडे देशभरातील ट्रक चालकांनी संप मागे घेण्याचा निर्णय उशिराने जाहीर केल्याने ३ जानेवारी रोजी देखील एपीएमसी भाजीपाला बाजारातील भाजीपाला आवक २० ते २५ टक्क्यांनी घटली. ३ जानेवारी रोजी एपीएमसी भाजीपाला बाजारात एकूण ६५३ गाड्या भाजीपाला आवक झाली. मात्र, एपीएमसी भाजीपाला बाजारात सलग तीन दिवस परराज्यातील आवक घटल्याने भाजीपाला दर ३० ते ३५टक्क्यांनी वधारल्याचे चित्र एपीएमसी मार्केट मध्ये दिसत होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी भाजीपाला बाजारात हिरवा वाटाणा आवक मध्ये घट