म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
खोपटा-कोप्रोली, दिघोडे-चिर्ले रस्त्याची पावसाळ्यात होणार धुळधाण
उरण : आता पावसाळा कोणत्याही क्षणी बरसण्याची शवयता आहे. असे असतानाही ‘पीडब्ल्यूडी'ने खोपटा-कोप्रोली आणि दिघोडे-चिर्ले रस्त्याच्या डांबरीकरणाचे किंवा खड्डे दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात सदर रस्त्याची धुळधाण होणार आहे, अशी भिती प्रवाशी व्यक्त करीत आहेत.
उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील खेड्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणून खोपटा-कोप्रोली आणि दिघोडे-चिर्ले या रस्त्यांकडे पाहिले जाते. या रस्त्यावरुन तालुक्याच्या ठिकाणी किंवा मुंबई शहराच्या दिशेने जाणारे हजारो चाकरमानी, नोकरदार, विद्यार्थी, प्रवाशी नागरिक तसेच लहान-मोठी वाहने वापर करत आहेत. खोपटा-कोप्रोली रस्त्याच्या डांबरीकरणासाठी एन.एच.एम.आय. कार्यालयाकडून सुमारे ३.७५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि खाजगी कंटेनर यार्ड, गोदाम व्यवस्थापकांकडून जवळपास २ ते ३ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. तर दिघोडे-चिर्ले या रस्त्यासाठी सुमारे १ कोटींच्या वर निधी खर्च करण्यात आलेला आहे.
मात्र, संबंधित कार्यालयातील भ्रष्ट कारभारामुळे खर्च करण्यात आलेला निधी वाया गेला असल्याचे चित्र या रस्त्यावरुन मार्गक्रमण करत असताना निदर्शनास येत आहे. पावसाळा कोणत्याही वेळी सुरु होणार असूनसुध्दा ‘पीडब्ल्यूडी'ने खोपटा-कोप्रोली आणि दिघोडे-चिर्ले रस्त्याच्या डांबरीकरणाचे किंवा रस्ता दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात सदर रस्त्याची धुळधाण होणार असल्याची चर्चा सुरु आहे.