३४ क्रमाकांची एनएमएमटी बस बंद; प्रवाशांचे हाल
वाशी : ८ फेब्रुवारी रोजी खोपटा येथे भरधाव वेगातील एनएमएमटी बसने दोन मोटारसायकलस्वारांना धडक दिल्याने झालेल्या भीषण एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या भीषण अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करुन एनएमएमटी बस कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले होते. त्याच्या निषेधार्ह नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्थानक ते उरण मधील कोप्रोली-वशेणी गाव दरम्यानची ३४ क्रमांकाची एनएमएमटी बस सेवा ९ फेब्रुवारी पासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे उरण परिसरातून नवी मुंबई शहराकडे ये-जा करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाची (एनएमएमटी) ३४ क्रमांकाची बस उरण तालुक्यातील कोप्रोली, वशेणी, पिरकोन या खेडेगावात धावत असल्याने आणि सदर बस सेवेचा प्रवास स्वस्त असल्याने ग्रामीण भागातील चाकरमानी, नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींना ३४ क्रमांकाच्या एनएमएमटी बस सेवेचा जास्त फायदा होत आहे. त्यामुळे उरण पुर्व भागातील अनेक नागरीक या बसने प्रवास करत असत. मात्र, ८ फेब्रुवारी रोजी खोपटे येथे झालेल्या अपघातानंतर ३४ क्रमांकाची एनएमएमटी बस बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील ऑटो रिक्षा चालक आणि ईको चालक यांचे फावले असून, त्यांच्याकडून अधिक दर आकारुन ग्राहकांची लुटमार सुरु असल्याची ओरड सुरु झाली आहे. पुर्वी प्रवाशांना ३४ क्रमांकाच्या एनएमएमटी बस मधून कोप्रोली येथून थेट नवी मुंबई मधील जुईनगर पर्यत जाता येत होते. मात्र, आता नवघर फाटा किंवा टाऊनशिप पर्यंत इको किंवा ऑटो मधून जाण्यासाठी २०-३० रुपये खर्च होत असल्यांना प्रवाशांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. ३४ क्रमांकाच्या एनएमएमटी बस मार्गावर दिवसभर ५२ फेऱ्या होऊन या बसमधून ५ हजारांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत होते. त्यामुळे या परिसरातील हजारो प्रवाशांना ३४ क्रमांकाची एनएमएमटी बस बंद झाल्याचा फटका बसला आहे. ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातानंतर आणि त्यानंतर एनएमएमटी कर्मचाऱ्यांना डांबून ठेवण्यात आल्याने एनएमएमटी कर्मचाऱ्यांनी जुईनगर ते कोप्रोली मार्गावर काम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ३४ क्रमांकाची एनएमएमटी बस सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी ‘एनएमएमटी'चे व्यवस्थापक योगेश कडुस्कर यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही.
उरण कोप्रोली येथे जाण्यासाठी ३४ क्रमांकाची एनएमएमटी बस सोयीची आणि बस भाडे देखील परवडते. मात्र, ९ फेब्रुवारी पासून ३४ क्रमांकाची एनएमएमटी बस सेवा बंद असल्याने प्रवाशांना नवघर फाटा येथून रिक्षा पकडून कोप्रोली गाठावे लागते. नवघर फाटा -कोप्रोली रिक्षा प्रवास अधिक खर्चिक आहे. त्यामुळे एनएमएमटी प्रशासनाने यावर तोडगा काढून ३४ क्रमांकाची एनएमएमटी बस सेवा तात्काळ सुरु करावी. - अवधूत मोरे, प्रवासी - नवी मुंबई.