कोरडा दिवस पाळू, डेंग्यू आजार टाळू

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने १६ मे हा राष्ट्रीय डेंग्यु दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. डेंग्यू आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी डासाची उत्पत्ती स्थाने कमी करण्यासाठी ,नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेच्यावतीने आरोग्य यंत्रणा नेहमीच काम करते. महापालिकेसोबत सर्व नागरिकांनी देखील सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी केले आहे.

 प्रत्येक वर्षी  16 मे हा राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून देशात साजरा करण्यात येतो. या वर्षीचे घोष वाक्य समुदायाच्या संपर्कात रहा ,डेंग्यूला नियंत्रित करा असे आहे. डेंग्यू आजाराचा प्रसार इडिस इजिप्टाय नावाच्या डासाच्या मादी मार्फत होतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. सिमेंट टाक्या, रांजण, प्लास्टिकच्या रिकाम्या बादल्या, नारळाच्या करंवंट्या, घरातील शोभेच्या कुंड्या, निरूपयोगी वस्तु, टायर्स व कुलर इत्यादीमध्ये जास्त दिवस पाणी साठलेल्या ठिकाणी  एडिस इजिप्टाय डासाची मादी अंडी घालते. एक डास एकावेळी दिडशे ते दोनशे अंडी घालते व यातून या डासाचा मोठा फैलाव होतो.या डासांची निमिर्ती होऊ नये यासाठी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे गरजेचे असते. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रामध्ये जलजन्य आजाराचे व्यवस्थापन करण्याच्यादृष्टीने  पुरेसे किटस् नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध करणे, शीघ्र प्रतिसाद पथक कार्यरत ठेवणे , पालिका कार्यक्षेत्रात जनजागृती करणे , कंस्ट्रशन साईटस् व घरोघरी भेट देऊन डास उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याच्या सूचना महापालिकेच्यावतीने मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राना दिल्या आहेत.

डेंग्यूचे स्वरूप
डेंग्यू ताप आजारात रुग्णास २ ते ७ दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोके दुःखी, सांधे दुःखी, स्नायु दुःची असा त्रास होतो, रुग्णास उलट्या होतात, डोळयाच्या आतील बाजु दुःखणे, अंगावर पुरळ येणे, नाक तोंड यातुन रक्तस्त्राव होणे, अशक्तपणा, भुक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे ही लक्षणे दिसुन येतात. अशी  लक्षणे दिसून आलेल्या रुग्णास तात्काळ नजिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करावे. तपासणी व उपचार सर्व आरोग्य संस्थेत मोफत उपलब्ध आहे.

प्रतिबंधात्मक उपाय
१. आपल्या घराभोवती  पाणी  साचू  देवू नका.
२. घरातील पाण्याचे सर्व साठे आठवड्यातून एकदा रिकामे करावेत व या साठ्यातील आतील बाजू तळ घासून पुसून कोरड्या करून पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत.
३. आपल्या परिसरातील खड्डे बुजवावेत त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी.
4. झोपतांना पूर्ण अंगभर कपडे घालावे, पांघरून घेऊन झोपावे.
5. संध्याकाळी 6ते 8 दरम्यान दारे खिडक्या बंद कराव्यात, खिडक्यांना जाळया बसवाव्यात, झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा.
7. घरातील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी, इ. ची वेळीच विल्हेवाट लावा, शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा.
8.डेंगी ताप आजाराची तपासणी व उपचार सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोफत उपलब्ध आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 उल्हासनगर महापालिकेचा डेटा बेस तयार करण्याचे काम अंतिम टप्यात