जप्त वाहनांचे सुटे भाग चोरणाऱ्याला अटक
वाशी : नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मधील अधिकारी-कर्मचारी यांनी वाहन तपासणी दरम्यान जप्त करुन आणलेल्या दोषी वाहनांचे सुटेभाग चोरीला जात आहेत. यापूर्वीही दोषी वाहनांचे सुटेभाग चोरीला जाण्याच्या घटना घडल्या असून, ३१ जानेवारी रोजी दोषी वाहनांचे सुटेभाग चोरणाऱ्या एका चोराला नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः पकडुन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
वाढत्या नागरिकरणासोबत नवी मुंबई शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात खाजगी वाहनांसह प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांचा अधिक भरणा आहे. मात्र, बऱ्याच वेळा प्रवासी आणि व्यावसायिक वाहने नियमबाह्य पध्दतीने रस्त्यावर चालविण्यात येत असतात. वाहुतक नियमांना तिलांजली देणाऱ्या वाहनांची नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाच्या भरारी पथकाद्वारे विशेष तपासणी केली जाते. या तपासणीत आढळणाऱ्या दोषी वाहनांवर कारवाई केली जाते. या कारवाईत दंड भरुन घेतला जातो. तसेच दोषी वाहने जप्त करुन वाहन चालकांना नोटीस दिली जाते. त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर जप्त केलेली वाहने सोडली जातात. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय मार्फत जप्त केलेली वाहने वाशी मधील एपीएमसी बाजार आवारातील मसाला मार्केट नजिक असलेल्या वाहन चाचणी जागेत आजवर ठेवली जात होती. मात्र, मागील काही महिन्यांपासून येथील वाहनांचे सुटे भाग चोरीला जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय मार्फत एपीएएमसी पोलीस ठाणे मध्ये तक्रार करण्यात आली होती. मात्र, ३१ जानेवारी रोजी चक्क नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक सुनील म्हेत्रे यांच्या पथकाने एपीएमसी परिसरात धाड टाकून वाहनांचे सुटे भाग चोरणाऱ्या दोन चोरांना पकडले असता त्यातील एक चोर पळून जाण्यात यशस्वी झाला तर दुसऱ्या चोराला एपीएमसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय मार्फत जप्त केलेली वाहनाचे सुटे भाग चोरणाऱ्या चोराला आरटीओ पथकाने पकडुन एपीएमसी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु असून, तपासाअंती सदर वाहनांचे सुटे भाग कुठल्या वाहनाचे आहेत, ते स्पष्ट होणार आहे. - हेमांगिनी पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी - नवी मुंबई.