गजानन काळे यांच्या विरोधात भूमीपुत्र आक्रमक

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अभियंत्याला शिवीगाळ करत दंडुकेशाही केल्या प्रकरणी स्थानिक भूमीपुत्र ठेकेदारांनी एकत्र येऊन सीवुडस्‌ येथील ‘मनसे'च्या कार्यालयात धडक देत जोरदार घोषणाबाजी करुन जाब विचारला.

‘मनसे'चे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ७ फेब्रुवारी रोजी सीवुडस्‌ येथे सुरु असलेल्या  महापालिकेच्या कामाच्या ठिकाणी येऊन भेट दिली. गजानन काळे  आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थानिक भूमीपुत्र इंजिनियर आहे, त्याला शिवीगाळ करुन कानाखाली मारण्याची भाषा वापरत उठाबशा काढायला लावल्या.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नवी मुंबई शहरातील स्थानिक भूमीपुत्र ठेकेदारांनी ८ फेब्रुवारी रोजी एकत्र येऊन आक्रमक पवित्रा घेत थेट काळे यांच्या कार्यालयावर धडक दिली. जोपर्यंत काळे जाहीर माफी मागत नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा ठाम निर्धार स्थानिक भूमीपुत्रांसह स्थानिक भूमिपुत्र ठेकेदारांनी केला होता. यावेळी जमलेल्या भूमिपुत्रांकडून काळे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. पुन्हा असा प्रकार घडल्यास प्रकल्पग्रस्त खपवून घेणार नाही. यावेळी भूमीपुत्रांची आक्रमकता पाहून पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.

पंरतु, जोपर्यंत काळे माफी मागत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला. तर झालेल्या प्रकरणा विषयी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाईल. अशी दंडुकेशाही टिकू देणार नाही. आम्ही सर्व भूमीपुत्र लढायला तयार आहोत. त्यामुळे गजानन काळे यांना जाब विचारला असून त्यांनी माफी मागितली असल्याचे उपस्थित भूमीपुत्रांनी सांगितले.

यापुढे असा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही गजानन काळे यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर आलो होतो. त्यांनी भूमीपुत्रांना शिवीगाळ का केली? यापुढेही असे प्रकार घडले तर आम्ही उलट उत्तर देण्याचे काम करु आणि कायदेशीर लढाई लढू. आमचा एल्गार सर्वांनाच माहिती आहे. - अमित मढवी, करावे गांव.

स्थानिक आगरी-कोळी समाजाच्या भावना दुखविण्याचा आमचा हेतू नव्हता. नवी मुंबईत कॉन्ट्रॅक्टर कडून महापालिका मार्फत कामे सुरु आहेत. त्यावर प्रकाश टाकण्यासाठी गेलो होतो. जर माझ्यामुळे भावना दुखावल्या असतील तर मी आगरी-कोळी समाज बांधवांची माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो. -गजानन काळे, शहर अध्यक्ष - मनसे, नवी मुंबई. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 ‘सपा'च्या पदाधिकाऱ्यांचा ‘शिवसेना'मध्ये प्रवेश