जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक चळवळीकडून प्रबोधनपर माहिती

पनवेल : निरनिराळ्या भेटवस्तूंचे आमिष दाखविणाऱ्या अनुचित व्यापारी प्रथेविरुद्ध ग्राहकाने लढा देणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन ग्राहक चळवळीच्या प्रमुख कार्यकर्त्या सौ. शैलजा आपटे यांनी केले. पनवेल उरण आगरी समाज मंडळ, पनवेल व जनजागृती ग्राहक मंच, रायगड तालुका पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिनादिवशी आयोजित केलेल्या येथील महात्मा ज्योतिबा फुले (आगरी समाज) सभागृहात त्या बोलत होत्या.

 ग्राहक उपभोक्ता जन्मापासून मृत्यूपर्यंत किंबहुना मृत्यूनंतरही उपभोक्ता असतो. ग्राहक राजा असूनदेखील तो सामान्य मानला जातो. ग्राहकास निवडीचा, माहितीचा, संरक्षणाचा व तक्रारीचा अधिकार असतो. उत्पादनावर  हॉलमार्क, ॲगमार्कसारखा मार्क असतो. उत्पादनाच्या वेस्टनावर वस्तूचे नाव, उत्पादकाचे नाव, वस्तूचे वजन, किंमत, पोषणमूल्य, मूळ घटक इत्यादी तपशील असतो. अन्नपदार्थाच्या बाबतीत शाकाहारी की मांसाहारी दर्शाविणाऱ्या खुणा असतात. औषधाच्या बाबतीत वापराच्या अंतिम तारखेचा उल्लेख असतो. आकाशवाणीचा जागो ग्राहक जागो. हा कार्यक्रम माहितीप्रद असल्याचेही आपटे  यांंनी सांगितले. तसेच वस्तूची खरेदी केल्यानंतर त्याची पावती घेण्याविषयी त्यांनी सूचना केल्या.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनजागृती ग्राहक मंचाचे अध्यक्ष काशिनाथ जाधव यांनी केले. आगरी समाज मंडळाचे अध्यक्ष अतुल दि.बा. पाटील यांनी वस्तूच्या वेष्टणावरील छापील किमतीपेक्षा जास्त पैसे देऊ नयेत. हे आवर्जून सांगितले. खारघर सहकार भारतीच्या सौ. त्रिवेणी सालकर यांनी त्यांच्या संस्थेच्या काय्रााविषयी माहिती दिली. कार्यक्रमास जनजागृती ग्राहक मंचाचे जिल्हाध्यक्ष मंगेश माळी, तालुका उपाध्यक्ष सुभाष फडके, आगरी समाज मंडळाचे उपाध्यक्ष अनंतराव पाटील, संदीप पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आगरी समाज मंडळाचे खजिनदार विजय गायकर यांनी  केले. आगरी समाज मंडळाचे व ग्राहक मंचाचे सचिव बी. पी. म्हात्रे  यांनी आभार मानले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मालमत्ता कर भरण्यास नागरिकांचा प्रतिसाद वाढला