इर्शाळवाडीच्या दुर्घटनेत पनवेल महानगरपालिकेचा मदतीसाठी सक्रिय सहभाग

मदतीसाठी एनडीआरएफच्या पथकासोबत  दुर्घटना स्थळी  सर्वात प्रथम पनवेल महानगरपालिकेचे पथक

पनवेल : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून आपत्तीचे संकट ओढावले आहे. या दुर्घटनेत आदिवसी पाड्यांवरती बचाव व मदत करण्यासाठी पनवेल महापालिकेने सक्रिय सहभाग नोंदविला. दुर्घटना झाल्याच्या दिवशी रात्री आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीसाठी एनडीआरएफच्या पथकासोबत  दुर्घटना स्थळी  सर्वात प्रथम पनवेल महानगरपालिकेचे पथक पोहचले.

इर्शाळ गड येथील दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच दिनांक 20 जुलै रोजी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सचिन पवार ,उपायुक्त गणेश शेटे, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते यांनी नियोजन करून रात्री 1.30 वाजता महापालिकेचे पथक दुर्घटनास्थळी  पाठिविण्यात आले होते.यावेळी उपायुक्त गणेश शेटे यांच्या समवेत  2 स्वच्छता निरीक्षक, एक कनिष्ठ अभियंता, एक अग्निशमन अधिकारी आणि इतर 65 कर्मचारी इर्शाळ गडाच्या पायथ्याशी असलेल्या अदिवासी वाडीवरती पाठविण्यात आले होते. यांच्यासोबत 2 जेसीबी, 11 रुग्णवाहिका, 100 चादरी, फावडे, टिकाव, पाण्याच्या बाटल्या इरशाळ येथे पाठविण्यात आल्या होत्या. या पथकाने घरांवरील  मातीचे ढिगारे उपसून, मातीखाली अडलेल्या नागरिकांना व मृतांना बाहेर काढले.

दिनांक 20 जुलै पासून गेली चार-पाच दिवस सातत्याने पनवेल महानगरपालिका दुघर्टनास्थळी आपले पथक पाठवत आहे.  दिनांक 21 जुलै रोजी पालिकेने एक उप अभियंता , दोन स्वच्छता निरीक्षक,  अग्निशमन अधिकारी ,सहा अग्निशमन जवान, 50 कर्मचारी पाठविण्यात आले होते. दिनांक 22 जुलै  व  दिनांक 23 जुलै  रोजी 1 उप अभियंता, 2 स्वच्छता निरीक्षक,अग्निशमन अधिकारी सहा अग्निशमन जवान , 60 कर्मचाऱ्यांसहित फॉगींग मशीन, 2 स्प्रेंइग मशीन इर्शाळ गडाच्या खालील बेस कॅम्पमध्ये पाठविण्यात आले. आज दिनांक 24 जुलै रोजी दोन स्वच्छता निरीक्षक, 15 कर्मचाऱ्यांसोबत 2 जेटिंग मशीन , 2 फॉगींग मशीन, 2 स्प्रेंइग मशीन पालिकेच्यावतीने पाठविण्यात आले आहे.

इर्शाळगडाच्या पायथ्याला डोंगरात वसलेल्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पाड्यावर बचाव व मदत कार्य युध्दपातळीवर सुरु असून यासाठी शासकीय यंत्रणा संपूर्ण प्रयत्नशील आहे. इर्शाळ गडाच्या खालील बेस कॅम्पमध्ये महापालिकेच्या पथकांच्या माध्यमातून फवारणी करण्यात येत आहे. त्या ठिकाणी उभ्या केलेल्या तात्पुरत्या कंटेनर घरांची संपूर्ण सफाई पनवेल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्या ठिकाणी 60  पोर्टेबल शौचालये उभी करण्यात आली असून त्याची संपूर्ण व्यवस्था महानगरपालिकेमार्फत करण्यात आली आहे. तसेच पालिकेच्या पथकाच्या माध्यमातून ब्लिचींग पावडर टाकण्यात आली आहे. न भूतो न भविष्यती अशी ही घटना घडली असून पनवेल महानगरपालिका यामध्ये सर्वतोपरी मदत करत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिनांक 17 जुलै ते 24 जुलै पर्यत 762.84 मि.मी पावसाची नोंद