एपीएमसी बाजारात काळी द्राक्षे दाखल

वाशी : महाराष्ट्र राज्यात सध्या थंडी वाढल्यामुळे द्राक्षांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकरी मळ्यातील द्राक्षे लवकर काढत आहेत. परिणामी, वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात आता काळ्या द्राक्षांची चांगली आवक होऊ लागली आहे. सध्या एपीएमसी फळ बाजारात रोज ४० ते ५० गाड्या द्राक्ष आवक होत आहे. मात्र, आवक प्रमाणे उठाव होत नसल्याने द्राक्षांचे दर कमी आहेत.

वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात सध्या फलटण, नगर, बारामती, सांगली आणि तासगाव मधून दररोज द्राक्षांच्या ४० ते ५०  गाड्या येत आहेत. त्यामुळे  एपीएमसी फळ बाजारात मोठ्या प्रमाणात द्राक्षे पाहायला मिळत आहेत. त्यात काळ्या द्राक्षांची आवक यावर्षी अधिक आहे. मागे, द्राक्षांचा ऐन हंगाम सुरु होण्याच्या तोंडावरच पाऊस पडल्याने द्राक्ष पिकाला त्या पावसाचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे हंगाम सुरु होतानाच बाजारातून द्राक्षे गायब झाली होती तर दुसरीकडे बाजारात दाखल द्राक्षांनाही पाणी लागल्याने द्राक्ष खराब होण्याचे प्रमाण आधिक होते. परिणामी यंदाही अवकाळी पावसाची भीती असल्याने शेतकरी लवकर द्राक्षे काढत आहेत.  एपीएमसी फळ बाजारात शरद सिडलेस, जंबो, जेट्टी आणि कृष्णा या चार जातीची द्राक्षे दाखल होत आहेत.त्यांनतर नाशिक मधील द्राक्षे दाखल होणार आहेत. मात्र, द्राक्षे लवकर काढल्याने चवीला मध्यम आंबट आहेत. त्यामुळे या द्राक्षांना उठाव नाही.यातील जंबो आणि कृष्णा द्राक्षांना ७० ते १०० रुपये तर इतर द्राक्षांना ४० ते ५० रुपये  प्रतिकिलो दर भेटत आहे.
नोव्हेंबर पासून  एपीएमसी फळ बाजारात द्राक्षे दाखल होण्यास सुरुवात होत असून, येत्या मार्च, एप्रिल पर्यंत द्राक्ष हंगाम असाच राहणार आहे. त्यामुळे मार्चपर्यंत सर्वांना द्राक्षांची चव चाखता येणार आहे, अशी माहिती  एपीएमसी फळ बाजारातील फळ व्यापारी बाळकृष्ण शिंदे यांनी दिली. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘सखोल स्वच्छता मोहीम'ची लवकरच अंमलबजावणी