महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे तातडीने लागू करावेत -गृहमंत्री अमित शाह
घणसोली मधील तलावातील पाणी दूषित; ५ पान कोंबडी पक्षांचा मृत्यू
वाशी : नवी मुंबई महापालिका प्रशासनाने घणसोली गावातील शिवाजी तलावाची सुरक्षा वाऱ्यावर सोडली असून, देखभाल दुरुस्तीकडेही दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे. तीन दिवसांपुर्वी घणसोली गावातील शिवाजी तलावात एका व्यवतीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता तलावातील दूषित पाण्यामुळे ५ पान कोंबडी पक्षांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात स्थानिकांनी रोष व्यक्त करत शिवाजी तलावाची साफसफाई करुन या ठिकाणी सुरक्षा कडक करावी, अशी मागणी केली आहे.
तलाव व्हिजन अंतर्गत नवी मुंबई महापालिकेने २०१० साली नवी मुंबई शहरात तलावांची निर्मिती करुन इतर शहरांना आदर्श घालून दिला होता. मात्र, तलावांची सुरक्षा आणि स्वच्छता अबाधित ठेवण्यात महापालिकेला सध्या अपयश आल्याचे चित्र दिसत आहे. घणसोली गावात शिवाजी तलाव असून, या तलावाकडे महापालिकेचे पुरते दुर्लक्ष होत आहे. शिवाजी तलाव भोवती रात्री-अपरात्री अंमली पदार्थ सेवन करणारे बसत असतात. तीन दिवसांपूर्वी या तलावात एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.तसेच तलावात प्लास्टिक बाटल्यांचा खच पडला असून, येथील इमारतींमधील मलनिःसारण पाणी देखील या तलावात येत असल्याचा संशय स्थानिकांनी व्यवत केला आहे. या तलावातील पाणी दूषित होऊन ५ पान कोंबडी पक्षांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शिवाजी तलावाची तात्काळ सफाई करुन या ठिकाणी सुरक्षा कडक करावी, अशी मागणी आता स्थानिकांकडून जोर धरु लागली आहे.
घणसोली गावातील शिवाजी तलावाची तात्काळ सफाई करण्याच्या सूचना देण्यात येतील. तसेच ५ पान कोंबडी पक्षांच्या मृत्यूबाबत पाणी तपासले जाणार असून, सुरक्षा रक्षक तैनात करण्याबाबत स्थापत्य विभागास कळविले जाणार आहे. - जयंत जावडेकर, सहाय्यक आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन विभाग) - नवी मुंबई महापालिका.