म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
एपीएमसी आवारातील सर्व इमारती धोकादायक
संरचना परीक्षण करुन अहवाल देण्यास टाळाटाळ?
वाशी : वाशी मधील ‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती'च्या (एपीएमसी) पाचही आवारातील सर्व इमारतींसह मॅफको मार्केट इमारत नवी मुंबई महापालिका प्रशासनाने धोकादायक घोषित केली आहे. त्यामुळे सदर इमारतीमधील गाळेधारकांना पर्यायी व्यवस्था नसल्याने यंदा देखील स्वतःचा जीव मुठीत धरुन व्यवसाय करावा लागणार आहे.
मुंबई मधील मस्जिद बंदर येथे होणारी गर्दी लक्षात घेऊन शेतकरी आणि व्यापारी यांच्या सोयीसाठी १९८२ साली मुंबई शहरातील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती वाशी-तुर्भे येथील ‘सिडको'च्या १७५ एकर जागेत वसवण्यात आली. त्यानंतर अल्पावधितच वाशी मधील ‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती'ची आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ अशी ओळख निर्माण झाली. मात्र, येथील इमारतींचे बांधकाम निकृष्ट केल्याने अवघ्या २० वर्षातच या इमारती जीर्ण होऊन काही ठिकाणी छताचा भाग कोसळून धक्के तुटले तर धक्यांवरील भागातील प्लॅस्टर कोसळू लागले. इमारतीला खांबाना तडे जाण्यास सुरुवात झाली.त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने सर्वप्रथम २००५ साली एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट मधील इमारती धोकादायक असल्याचे घोषित केले होते. तर आता संपूर्ण एपीएमसी कांदा-बटाटा,फळ ,भाजी,धान्य आणि मसाला मार्केट मधील सर्व इमारती तसेच मसाला मार्केट मधील मध्यवर्ती सुविधा इमारत आणि मॅफको मार्केट इमारत देखील धोकादायक घोषित करण्यात आली आहे. तसेच या इमारती पडून काही दुर्घटना घडल्यास त्यास नवी मुंबई महापालिका जबाबदार राहणार नाही, असे नवी मुंबई महापालिका तर्फे जाहीर करण्यात आले आहे.
मागील अनेक वर्षापासून महापालिका मार्फत एपीएमसी आवारातील इमारती धोकादायक असल्याचे घोषित करुन देखील एपीएमसी प्रशासनाने व्यापाऱ्यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन न दिल्याने येथील व्यापाऱ्यांना स्वतःचा जीव मुठीत धरुन व्यवसाय करावा लागत आहे. याबाबत ‘एपीएमसी'चे कार्यकारी अभियंता सुरेश मोहाडे आणि कांदा-बटाटा मार्केट सहाय्यक अभियंता मेहबूब व्यापारी यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही.
मागील वर्षी दोन दुर्घटना
नवी मुंबई महापालिकेने धोकादायक घोषित केलेल्या एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट मधील एफ गल्लीत मागील वर्षी १७ जुलै २०२३ रोजी गाळ्याचा सज्जा कोसळला होता. मात्र, सदर घटना रात्री आठ वाजता घडली होती. त्यामुळे त्या ठिकाणी कोणी जखमी किंवा जीवित हानी झाली नाही.त्यानंतर महापालिकेने एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट रिकामे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पर्यायी जागा नसल्याने गाळे खाली करण्यास एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट मधील व्यापाऱ्यांनी नकार दिला. तर २२ नोव्हेंबर २०२३ रोजी एपीएमसी धान्य बाजारातील वाय गल्लीत सज्जा/छताचा काही भाग पडल्याची घटना घडून दोन कामगार गंभीर जखमी झाले होते.
संरचना परीक्षण करुन अहवाल देण्यास टाळाटाळ?
नवी मुंबई शहरातील ३० वर्ष जुन्या इमारतींचे तज्ञ वास्तू विशारदांकडून तसेच नामांकित परीक्षण संस्थांकडून संरचना परीक्षण करुन त्याचा अहवाल नवी मुंबई महापालिकेकडे सादर करण्याचे तसेच अहवालात दुरुस्ती अथवा पाडकाम बाबत दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशानुसार एपीएमसी प्रशासनाला वारंवार पत्र देऊन देखील एपीएमसी प्रशासनाने एपीएमसी आवारातील इमारतींचे संरचना परीक्षण केलेले अहवाल दिलेले नाहीत, अशी माहिती नवी मुंबई महापालिका सहाय्यक आयुक्त तथा तुर्भे विभाग अधिकारी भरत धांडे यांनी दिली.