ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
एप्रिल २०२० पासून थकीत कराचा २ महिन्यात भरणा करा
पनवेल: ‘खारघर को.ऑप. हाऊसिंग सोसायटीज फेडरेशन लि.'तर्फे पनवेल महापालिका मार्फत आकारण्यात आलेल्या पूर्वलक्षी मालमत्ता कराबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या स्पेशल लीव्ह पिटीशन क्र.१०८४९/२०२३ मधील सिव्हिल अपील क्र.६०६५/२०२४ संदर्भात अंतरिम निकाल २९ एप्रिल २०२४ रोजी लागला आहे. सदर अंतरिम निकालानुसार करनिर्धारण वर्ष २०२०-२१, २०२१-२२ पासून मालमत्ता कराच्या सर्व थकीत रवकमेचा भरणा २ महिन्यांच्या आत करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. या निर्णयामुळे सुमारे ७५० कोटी रुपयांचा भरणा पनवेल महापालिकेच्या तिजोरीत होणार आहे. तरीही सदर निर्णयावर अपीलार्थी यांनी दाखल केलेल्या मिसेलिनियस ॲप्लिकेशन बाबत सर्वोच्च न्यायालयाने १८ मे २०२४ रोजी अधिक स्पष्टता दिली असून यानुसार मालमत्ताधारकांनी करनिर्धारण वर्ष २०२१-२२ पासूनच्या मालमत्ता कराची सर्व थकीत रक्कम भरणा करावयाची आहे.
२९ एप्रिल २०२४ रोजीच्या अंतरिम निर्णयातील निर्देशानुसार सर्वोच्च न्यायालयासमोरील स्पेशल लीव्ह पिटीशनच्या अनुषंगाने भविष्यात अपिलार्थी यांचे अपील अयशस्वी ठरल्यास त्यांना २०१६ पासून सर्वोच्च न्यायालय निर्देश देईल, त्या दराने व्याजासह सर्व थकीत रवकमेचा भरणा करावा लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मालमत्ता कराची गणना करुन सुधारित देयके तयार करण्याचे काम युध्दपातळीवर पूर्ण झाले आहे. २६ मे पासून सदर देयके नागरिकांकरिता महापालिकेच्या ऑनलाईन पोर्टलवर (संकेतस्थळ) तसेच मोबाईल ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. सुधारित देयकामध्ये १ ऑवटोबर २०१६ ते सन २०२०-२१ पर्यंतचा कालावधी भाग ‘अ'ने दर्शविला असून सन २०२१-२२ ते २०२३-२४ पर्यंतचा कालावधी भाग ‘ब' आणि सन २०२४-२५ चा कालावधी भाग ‘क'ने दर्शविला आहे, असे पनवेल महापालिका आयुवत डॉ. प्रशांत रसाळ यांनी सांगितले.
भाग ‘अ' मधील मालमत्ता कराची सर्व थकीत रक्कम मिळकतधारकाने भरणा केल्यास, ती सर्वोच्च न्यायालयाच्या सदर अंतरिम निर्णयास अधीन असेल. भाग ‘अ' मधील मालमत्ता करावरील शास्तीची रक्कम सर्वोच्च न्यायालयाच्या याबाबतीत भविष्यातील निर्णयानुसार परिगणना करुन वसूलपात्र असेल. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भाग ‘ब' मधील रवकमेचा भरणा २९ जून २०२४ अखेर करणे बंधनकारक आहे, असे आयुवत डॉ. रसाळ म्हणाले.
दरम्यान, सदर निर्णयाच्या अनुषंगाने सुधारित देयके तयार करण्याचे विशेष काम मालमत्ता कर उपायुक्त मारुती गायकवाड आणि सहायक आयुक्त श्री स्वरुप खारगे यांनी पार पाडले.
सुधारित बिलाचे प्रिंटींग आणि वाटप प्रक्रिया सुरु असून नागरिकांनी विलंब न करता ऑनलाइन पोर्टल (संकेतस्थळ), ॲप, महापालिका कार्यालयास भेट देऊन २९ जून २०२४ पूर्वी कर भरणा करण्यात यावा. सदर निर्णयामुळे सुधारित देयके पुन्हा तयार करावी लागल्याने सन २०२४-२५ रोजीच्या चालू कर मागणीवर ३१ मे अखेर देण्यात आलेली ५ टक्के इतकी सूट ३० जून २०२४ पर्यंत वाढविण्यात आलेली असून नागरिकांनी याचा फायदा घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय मालमत्ता कराचा भरणा ऑनलाईन केल्यास एकूण २ टक्के इतकी सूट दिली जात असल्याने नागरिकांनी त्वरित कर भरणा करावा. - डॉ. प्रशांत रसाळ, आयुवत-पनवेल महापालिका.