माध्यमिक शिक्षक पदासाठी ५३३ अर्ज प्राप्त
महापालिका शाळेत तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात १४२ शिक्षक हजर
तुर्भे : नवी मुंबई महापालिका शाळेत तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक भरती प्रक्रिया सुरु असून, अद्यापपर्यंत १४२ शिक्षक हजर झाले आहेत, अशी माहिती महापालिका उपायुवत (शिक्षण विभाग) दत्तात्रेय घनवट यांनी दिली.
नवी मुंबई महापालिकेच्या ५३ प्राथमिक आणि २३ माध्यमिक शाळा असून, या शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणाकरिता तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतला आहे.
प्राथमिक विभागात मराठी माध्यमात ८८, हिंदी माध्यमात ३१, ऊर्दू माध्यमात ४ अशाप्रकारे एकूण १२३ शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. तसेच माध्यमिक विभागासाठी मराठी माध्यमात ३७, हिंदी माध्यमात ११, उर्दू माध्यमात २ आणि इंग्रजी माध्यमात १० मिळून ६० शिक्षक तात्पुरती भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी १० जुलै या दिवशी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये प्राथमिक शिक्षक पदासाठी अर्ज ५८० प्राप्त झाले तर माध्यमिक शिक्षक पदासाठी ५३३ अर्ज प्राप्त झाले. १३ जुलै रोजी प्राथमिक तर १५ जुलै रोजी माध्यमिक शिक्षकांची निवड आणि प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार नियुक्तीपत्र घेऊन ५ दिवसांत शाळेवर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माध्यमिक शिक्षक पदासाठी ५५ जण पात्र झाले असून, त्यापैकी ४० जण १८ जुलै रोजी हजर झाले. प्राथमिक शिक्षक पदासाठी १०२ शिक्षक हजर झाले आहेत. निवड यादी प्रसिध्द झाल्यापासून ५ दिवसात नियुक्तीपत्र घेण्यासाठी शिक्षक उपस्थित हजर झाले नाही ंतर प्रतीक्षा यादीवरील शिक्षकांचा नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका उपायुवत (शिक्षण विभाग) दत्तात्रेय घनवट यांनी दिली.