मोरबे धरणात २९ टक्के पाणी शिल्लक
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका हद्द वगळता जवळच्या मुंबई, ठाणे, पनवेल आदि सर्वच महापालिका हद्दीमध्ये पाणी कपातीचे धोरण अवलंबिण्यात आले आहे. तर स्वतःच्या मालकीचे धरण असलेली जलसंपन्न महापालिका अशी ओळख असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणात २९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी पाणी कपातीचे धोरण महापालिका प्रशासनाने स्वीकारलेले नसले तरीही पावसाचा अंदाज पाहता नागरिकांनी पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिका अतिरिवत शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी केले आहे.
गतवर्षी २०२३-२४ मध्ये मोरबे धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने मोरबे धरण सप्टेंबर-२०२३ मध्ये पूर्णपणे भरले होते. वास्तविक पाहता नवी मुंबई शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी मोरबे धरणातून प्रतिदिवस ४८८.९७ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यातील जवळपास ४८१ एमएलडी पाणी जीवन प्राधिकरणाच्या साठ्यात पोहोचते. तेथून जलशुध्दीकरणानंतर सीबीडी आणि इतर प्राधिकरणांसाठी प्रत्यक्षात ४७९ एमएलडी पाणी वितरीत केले जाते. पर्यंत नवी मुंबई शहरासह कामोठे (५०.९१एमएलडी) आणि मोरबे परिसरातील ७ गावांना (६.३० एमएलडी) पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय नवी मुंबई महापालिकाच्या वतीने खारघर विभागासाठी (८.६५ एमएलडी), एमआयडीसी (४ एमएलडी), सीबीडी (११.७० एमएलडी) पाणी तर प्रत्यक्षात नवी मुंबई महापालिका हद्दीत ३९५.०२ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे.
सद्यस्थितीत मोरबे धरणात २९ टक्के जलसाठा शिल्लक असून धरणात पाण्याचा २५ टक्के राखीव कोटाही आहे. दुसरीकडे गतवर्षी मोरबे धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मोरबे धरणाने ८८ मीटरची पातळी गाठली होती. यानंतर सप्टेंबर २०२३ मध्ये मोरबे धरण १०० टक्के भरले होते. तर अद्याप मान्सूनला सुरुवात झालेली नसून पावसाचा आगामी अंदाज बघता केरळला सुरु झालेला पाऊस येत्या आठवड्यात महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी बरसेल, असा अंदाज वेधशाळेने दिला आहे. तरीही पाऊस लांबणीवर गेल्यास किंवा अन्या कारणाने मान्सून दाखल होण्यास उशीर झाल्यास इतर शहरांप्रमाणे नवी मुंबई शहरातही पाणी कपात करणे महापालिकेला क्रमप्राप्त होऊ शकते. त्यामुळे नवी मुंबईकर नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करुन महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिवत शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी केले आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणात किमान जुलै २०२४ पर्यंत पुरेल इतका जलसाठी उपलब्ध आहे. तुर्तास नवी मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट नाही. वेधशाळेच्या अंदाजानुसार येत्या आठवड्याभरात मान्सूनला सुरुवात होणार असल्याचे समजते. तरीही पाऊस लांबणीवर गेल्यास आवश्यक उपाययोजना करण्याची तजवीज महापालिका प्रशासनाने करुन ठेवली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात इतर महापालिकांप्रमाणे पाणी कपातीचे धोरण अवलंबिण्यात आलेले नाही. सद्यस्थितीत महापालिकाकडून नवी मुंबई शहरात एकवेळचा नोडनिहास पाणी पुरवठा टप्प्याटप्प्याने बंद ठेवला जातो. महापालिकेने पाणी कपातीपेक्षा पाणी बचतीचे धोरण स्वीकारलेले आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करुन महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे. - अरविंद शिंदे, अतिरिवत शहर अभियंता - नवी मुंबई महापालिका.