अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाजारात आंब्याची आवक कमी
वाशी : हिंदु वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला ‘अक्षय तृतीया' सण आज १० मे साजरा होणार आहे. अक्षय तृतीयेच्या सणासाठी वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात आंब्याची आवक वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र, मागील एप्रिल महिन्याच्या तुलनेत एपीएमसी फळ बाजारात आंबा आवक कमी आहे. ९ मे रोजी एपीएमसी फळ बाजारात कोकणातील ४३,३३६ पेटी हापूस आंबा दाखल झाला आहे.
अक्षय तृतीया सणापासून आंबा खाण्याचा प्रघात असल्याने ‘अक्षय तृतीया' सण साजरा करण्यासाठी घरोघरी ‘आमरस पुरीचा' बेत केला जातो. यंदा आज १० मे रोजी ‘अक्षय तृतीया' सण आहे. या सणाच्या निमित्ताने वाशी येथील मुंगई कृषि उत्पन्न बाजार समिती आवारामध्ये हापूस आंब्याची आवक वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र, एपीएमसी बाजारात हापूस आंब्याची आवक ४२ हजार पेटीपेक्षा कमी झली आहे.
एपीएमसी फळ बाजारात साधारण मार्च महिन्यापासून हापूस आंब्याच्या हंगामाला सुरुवात होते.मार्च ,एप्रिल आणि मे महिना असा हापूस आंब्याचा हंगाम असून मे महिना शेवटचा हंगाम असल्याने आवक वाढून लाखाच्या घरात जाते. मात्र, यंदा कोकणात आंब्याला पोषक वातारण तयार झाल्याने आंबा काढणीला लवकर आला. त्यामुळे एपीएमसी बाजारात मार्च महिन्यात हापूस आंबा पेट्यांनी ३५ हजारचा पल्ला पार करत एप्रिल मध्ये ७० हजारवर मजल मारली होती. त्यामुळे मे महिना आणि अक्षय तृतीया सणावर हापूस आंब्याची आवक वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र, हापूस आंब्याची आवक सरासरीपेक्षा कमी होती. त्यामुळे हापूस आंब्याचे दर अजूनही ५०० ते १००० रुपये डझनवर स्थिरावले असल्याने ऐन सणाला आंब्याला मागणी देखील तुरळक राहिली आहे, अशी माहिती एपीएमसी फळ मार्केट मधील आंबा विक्रेता अक्षय खेबडे यांनी दिली.
तयार ‘आमरस'कडे ग्राहकांचा अधिक कल
वैशाख शुध्द तृतीया दिवसाला अक्षय तृतीया असे म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने अक्षय तृतीयेचे औचित्य साधून नागरिक सोने-चांदी, वाहने, घर, गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आदींची खरेदी करतात. या दिवशी अनेक शुभ कार्यांचा प्रारंभ केला जातो. तसेच अक्षय तृतीयेपासून आंबा खाण्याचा प्रघात असल्याने ‘अक्षय तृतीया' सण साजरा करण्यासाठी घरोघरी ‘आमरस पुरीचा' बेत केला जातो. मात्र, बाजारात आता काही नामांकित मिठाई दुकानदारांनी तयार आमरस करण्यावर भर दिला आहे.त्यामुळे आंबे आणून आमरस बनवणे अधिक खर्चिक झाले असून, त्यात वेळ देखील जात आहे. तर दुसरीकडे बाजारात दर्जेदार तयार आणि परवडणारे आमरस उपलब्ध होत असल्याने बाजारातील आमरस खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल अधिक वाढत चालला आहे.
वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात कोकणातील हापूस सोबतच कर्नाटकी आंब्याची आवक होत असते. कर्नाटकी आंब्याची आवक हापूस आंब्याच्या तुलनेत २५ ते ३० टक्के असते. मात्र, एपीएमसी फळ बाजारात आता कोकणातील आंब्याची आवक कमी झाली असून, कर्नाटकी आंब्याची आवक वाढली आहे. ९ मे रोजी एपीएमसी बाजारात कोकणातील हापूस आंबा ४३ हजार ३३६ पेटी तर कर्नाटकी आंबा ३९ हजार २७२ क्रेट दाखल झाला आहे.