‘एक्सप्रेस-वे'वर ११ जानेवारी रोजी मुंबई लेन ३ तास राहणार बंद
नवी मुंबई : महामार्ग वाहतूक पोलिसांकडून मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर हायवे टॅ्रफिक मॅनेजमेंट सिस्टीम या प्रकल्पातंर्गत टु लेग आणि थ्री लेग सर्व्हिसिएबल गॅन्ट्री बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे ११ जानेवारी रोजी दुपारी ३ तास महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे हद्दीत मुंबई वाहिनीवरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच या मार्गावरुन जाणाऱ्या वाहन चालकांची गैरसोय होऊ नये यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.
हायवे ट्रफिक मॅनेजमेंट सिस्टीम या प्रकल्पातंर्गत नोव्हेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावरील दोन्ही वाहिनीवर टु लेग आणि थ्री लेग सर्व्हिसिएबल गॅन्ट्री बसविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सदरचे काम मे. प्रोक्टेक सोल्युशन, आय.टी.एम.एस, एलएलपी कंपनीतर्फे सदरचे काम करण्यात येत आहे. यासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे हद्दीत मुंबईकडे येणाऱ्या वाहिनीवर ११ जानेवारी रोजी दुपारी १.३० ते ३.३० या कलावधीत टु लेग आणि थ्री लेग सर्व्हिसिएबल गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर मुंबई लेनवरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय महामार्ग वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक रविंद्र कुमार सिंगल यांनी जारी केले आहे.
सदर कामामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावरील मुंबई लेन वरील वाहतूक ३ तास बंद राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावरुन जाणाऱ्या वाहन चालकांची गैरसोय होऊ नये यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग निश्चित केले आहे. त्यानुसार मुंबई -पुणे एक्सप्रेस मार्गावरर पुण्याहुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या हलक्या वाहनांना आणि बसेसना खोपोली एक्झीट येथून वळवुन राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरुन खोपोली शहरातून पुढे शेडूंग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवर जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. तर हलक्या आणि जड-अवजड वाहनांना खालापूर टोल नाका येथून शेवटच्या लेनने खालापूर एक्झीट येथून राष्ट्रीय महामार्ग क्रं.४८ जुना पुणे-मुंबई मार्गावरुन खोपोली शहरातून पुढे शेडूंग टोल नाका मार्गे मुंबईच्या दिशेने येण्यास मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वरुन पुणे बाजुकडून मुंबई बाजुकडे येणाऱ्या वाहनांना शेडुंग फाट्यावरुन बोर्ले टोल नाका ऐवजी सरळ पनवेलच्या दिशेने येण्यास मार्ग निश्चित करण्यात आला आहे. सदरची वाहतूक अधिसूचना टु लेग सर्व्हिसेबल गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहणार आहे.