ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
धुतूम ग्रामस्थांचे इंडियन ऑईल अदानी व्हेंचर कंपनी विरोधात आंदोलन
उरण : धुतूम ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि. प्रकल्पात धुतूम गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कायमस्वरुपी कामावर सामावून घेण्यात यावे, या मागणीसाठी ‘धुतूम'च्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यावेळी कंपनीने ५ जानेवारी २०२४ पूर्वी प्रकल्पग्रस्तांना कामावर घेण्याचे मान्य केले होते. मात्र, सदर आश्वासनाची पूर्तता कंपनी व्यवस्थापनाने न केल्याने सरपंच सौ सुचिता ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी ५ जानेवारी रोजी कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या प्रकल्पग्रस्तांना ताब्यात घेतले आहे.
धुतूम ग्रामपंचायत हद्दीत ज्वलनशील पदार्थ साठवू ठेवणारा इंडियन आईल सध्याची इंडियन ऑईल अदानी व्हेंचर कंपनीचा प्रकल्प आहे. मात्र, या प्रकल्पातील रोजगार आणि नोकरीमध्ये येथील स्थानिकांना योग्य ते प्रतिनिधीत्व दिले नाही. त्यामुळे या प्रकल्पात गावातील उच्चशिक्षीत, कुशल आणि अकुशल कामगारांना प्रतिनिधीत्व देण्यात यावे यासाठी अनेक वर्षांपासून ग्रामस्थांचा कंपनी प्रशासनासोबत संघर्ष सुरु आहे. मात्र, कंपनी प्रशासन येथील प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात टाळाटाळ करत आहे. त्यामुळे सरपंच सुचिता ठाकूर आणि उपसरपंच कविता पाटील यांच्या नेतृत्वात धुतूम ग्रामस्थांनी २० नोहेंबर २०२३ पासून कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. या आंदोलनावेळी गावातील २३ प्रकल्पग्रस्त प्रत्यक्षात उपोषणाला बसले होते.
यावेळी धुतूम ग्रामस्थांनी एकदिलाने त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला होता. यानंतर सिडको, कंपनी प्रशासन, तहसिलदार आणि पोलीस या आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असताना उपोषणाच्या ९ व्या दिवशी कंपनी प्रशासन आणि धुतूम ग्रामस्थ यांच्यात अखेर सामोपचाराने चर्चा झाली. त्यावेळी इंडियन ऑईल अदानी व्हेंचर कंपनीत कॉन्ट्रक्ट मध्ये ३३ अकुशल प्रकल्पग्रस्तांना नोकरी आणि कंपनीत ज्यावेळेस भरती निघेल, त्यावेळेस गावातील सुशिक्षीत बेकारांना पहिले प्राधान्य देण्याचे आश्वासन देण्यात आले. यानंतर सदरच उपोषण मागे घेण्यात आले.
मात्र, कंपनीच्या व्यवस्थापनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने ५ जानेवारी २०२४ रोजी सरपंच सुचिता ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ ठाकूर, कविता पाटील, सुचिता कडू, चंद्रकांत ठाकूर, स्मिता ठाकूर, करिष्मा ठाकूर, अनिता ठाकूर, रविनाथ ठाकूर यांच्यासह गावातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन सुरु केले. यानंतर पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे परिसरात कंपनी आणि प्रशासन यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.