पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त ‘नवी मुंबई' चकाचक!
तुर्भे : भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १२ जानेवारी या दिवशी नवी मुंबई परिसरात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी येत आहेत. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून अति महत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा होणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्गासह पामबीच आणि ठाणे-बेलापूर मार्गही चकाचक करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी संबंधित सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
नवी मुंबई, पनवेल महापालिका, उरण नगरपरिषद, एमएमआरडीए, सिडको आदी सर्व प्राधिकरणाचे अधिकारी-कर्मचारी मागील दोन दिवसांपासून शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूच्या उद्घाटनाच्या ठिकाणापासून आजूबाजूचा परिसर स्वच्छ दिसावा यासाठी दिवसरात्र झटत आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील सफाई कामगार वाशी ते सीबीडी आणि जेएनपीटी महामार्गावरती साफसफाई करण्याकरिता मागील दोन दिवसांपासून लावण्यात आले आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहरातील काही ठिकाणच्या साफसफाईस विलंब लागत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू, नवी मुंबई मेट्रो लाईन प्रकल्प-१, खारकोपर-उरण रेल्वे आदी महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. तसेच याच वेळी महिला सशक्तीकरणाच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सायन-पनवेल महामार्ग, जेएनपीटी रोड, ठाणे-बेलापूर रस्ता, पनवेलकडून कार्यक्रम स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यासह उलवे नोडची साफसफाई केली जात आहे. रस्त्यांचे डांबरीकरण करणे, खड्डे बुजवणे, लेन मार्किंग, दुभाजक रंगवणे आदी कामे चालू आहेत. सायन-पनवेल महामार्ग आणि रेती बंदर-जेएनपीटी महामार्ग या रस्त्याच्या दुतर्फा पुष्कळ प्रमाणात डेब्रिज, वाढलेली झाडेझुडपे होती. यामुळे या मार्गाला बकालपणा आला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनामुळे या ठिकाणी पूर्णपणे स्वच्छता करण्यात येत आहे. यामध्ये काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात घाण असल्याने थेट पत्रे लावून रस्त्यालगतची घाण लपवण्याचे काम चालू आहे.
सायन-पनवेल महामार्गावर तसेच या मार्गाच्या लगत नेहमीच अस्वच्छता असल्याने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबई महापालिकेचे नाव खराब होऊ नये तसेच जनतेने या मार्गाच्या स्वच्छते संबंधी महापालिकेकडे तक्रार करु नये म्हणून या मार्गाची देखभाल आणि दुरुस्ती, स्वच्छता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत केली जाते असे फलक ठिकठिकाणी या महामार्गावर लावण्यात आले आहेत. मात्र, आता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने केंद्रातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना नवी मुंबई स्वच्छ आणि सुंदर दिसावी यासाठी नवी मुंबई महापालिका मार्फत वाशी पासून सीबीडी पर्यंत सायन-पनवेल महामार्गाची स्वच्छता आणि रंगरंगोटी करण्यात येत आहे.