‘अश्वमेध महायज्ञ'वेळी चोख पोलीस बंदोबस्त

नवी मुंबई : अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकुंज, हरिद्वार यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या २१ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत खारघरमध्ये होणाऱ्या ‘अश्वमेध महायज्ञ'दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि सह-पोलीस आयुक्त संजयसिंह  येनपुरे यांनी १३ फेब्रुवारी रोजी खारघर येथील ‘अश्वमेध महायज्ञ'च्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेसह वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली. तसेच यज्ञ स्थळ, प्रदर्शन, स्वयंसेवकांची निवासस्थाने, यज्ञात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या निवासाची व्यवस्था आदिंची त्यांनी माहिती घेतली. 

 खारघर येथे होणाऱ्या ‘अश्वमेध महायज्ञ'मध्ये देश-विदेशातून लाखो लोक सहभागी होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची उणीव राहू नये यासाठी १३ फेब्रुवारी रोजी ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी स्वतः महायज्ञस्थळाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत सह-पोलीस आयुक्त संजयसिंह येनपुरे, परिमंडळ-२चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त भारंबे यांनी ‘महायज्ञ'मधील सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व्यवस्था यासोबतच त्यांनी १००८ कुंडीय यज्ञशाळेची प्रत्यक्ष पाहणी केली.  

‘महायज्ञ समिती'च्या वतीने ‘महायज्ञ'च्या ठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थेबाबत पोलीस आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. तसेच महायज्ञ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पोलीस आयुक्तांसह सर्व पोलीस अधिकाऱ्यांचा ‘महायज्ञ समिती'च्या वतीने गायत्री मंत्र लिहिलेली अंतर्वस्त्रे इत्यादी देऊन सन्मान करण्यात आला.  

४ स्तरीय सुरक्षा व्यवस्था...  
‘अश्वमेध महायज्ञ'मध्ये अनेक मोठ्या नामवंत व्यक्ती, विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. त्यामुळे महायज्ञस्थळी ४ स्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यात स्थानिक पोलिसांसह ‘शांतीकुंज'चे सुरक्षा रक्षक, स्वयंसेवक तैनात ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय संपूर्ण यज्ञस्थळावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार असून, त्यासाठी ४०० सीसीटीव्ही कॅमेेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यावर स्थानिक पोलिसांसह ‘महायज्ञ समिती'च्या सुरक्षा विभागाकडून लक्ष ठेवले जाणार आहे. त्याचप्रमाणे यज्ञात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने साध्या वेशातील पोलीस देखील सदर भागात तैनात ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ड्रोनच्या सहाय्याने देखील सदर संपूर्ण महायज्ञावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पाकर्िंगसह इतर व्यवस्था पोलिसांकडून करण्यात येणार आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विज्ञान प्रदर्शन, रायफल शुटींग मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान