‘कल्याण'मधून श्रीकांत शिंदे ‘महायुती'चे उमेदवार

कल्याण : गेल्या अनेक दिवसांपासून ‘कल्याण'च्या जागेवरुन ‘महायुती'मध्ये धुसफूस चालू होती. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांनी ‘कल्याण'च्या सुभेदारीसाठी दावा सांगितला होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असुनही विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली नव्हती. पण, आता ‘कल्याण'च्या जागेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथून मोठी घोषणा केली आहे. डॉ. श्रीकांत शिंदे हेच ‘कल्याण'मधून ‘महायुती'चे उमेदवार असतील, असे ना. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

ठाणे, कल्याण मधील ‘भाजपा'च्या नेत्यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे. या नेत्यांनी आपली नाराजी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बोलूनही दाखवली आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांच्या प्रचाराचे काम करणार नाही, असा इशारा ‘भाजपा'चे आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी दिलेला आहे. पण, आता दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केल्याने आमदार गणपत गायकवाड यांच्यासह ‘भाजपा'चे स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्ते काय निर्णय घेतात? ते लवकरच स्पष्ट होईल. 

श्रीकांत शिंदे यांना ‘भाजपा'कडून विरोध नाही. डॉ. शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघामधून ‘महायुती'चे उमेदवार असणार आहेत. त्यांच्या पाठीमागे भाजपा खंबीरपणे उभी राहणार आहे. आम्ही ‘महायुती'मधील भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, रासपा, रिपाई असे सर्व घटकपक्ष पूर्ण ताकदीने आम्ही त्यांचा प्रचार करणार असून त्यांना निवडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. डॉ. श्रीकांत शिंदे मागच्या निवडणुकीपेक्षाही अधिक मताधिक्याने विजयी होतील, असे ना. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

वैशाली दरेकर विरुध्द श्रीकांत शिंदे
देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर आता ‘कल्याण'मध्ये ‘महायुती'चे डॉ. श्रीकांत शिंदे विरुध्द ‘महाविकास आघाडी'च्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात थेट लढत होणार आहे. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी जाहीर होताच, वैशाली दरेकर यांनी जोमात प्रचार सुरु केलेला आहे. श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत. तर ‘महाविकास आघाडी'च्या वैशाली दरेकर या सर्वसामान्य कार्यकर्त्या आहेत. त्यामुळे ‘कल्याण'मध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र विरुध्द एक सामान्य कार्यकर्ता अशी लढत घडवून आणण्याचा प्रयत्न उध्दव ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळ यात कोण बाजी मारणार? ते येत्या ४ जून २०२४ रोजी स्पष्ट होईल. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करा