आंबा कोयी संकलन उपक्रमाला नागरिकांचा उत्साही प्रतिसाद
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका तर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा कोयी संकलनाची विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, आंबा कोयी संकलनासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष वाहनात १२ हजारापेक्षा अधिक आंबा कोयी जमा झाल्या आहेत.
नवी मुंबई महापालिकेने आंब्याच्या सुकलेल्या कोयी जमा करण्याचे आवाहन केल्यापासून आंबा कोयी संकलन अत्यंत आगळावेगळा उपक्रम असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून विविध माध्यमांतून प्राप्त झाली असून, विशेष वाहनात आंबा कोयी जमा करण्यातही नागरिकांचा उत्साह दिसून येत आहे.
दरम्यान, ‘गुठली रिटर्न्स' उपक्रम ‘रेड एफएम' यांच्या द्वारे मोठ्या प्रमाणावर राबविला जात असून, त्यांच्याकडे संकलित होणाऱ्या कोयी ते शेतकऱ्यांपर्यंत आंबा रोप लागवडीसाठी पोहचवून त्यांना उदरनिर्वाहाचे पर्यायी साधन उपलब्ध करुन देत आहेत. नवी मुंबई महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात आंबा कोयी संकलित होणार असल्याने त्यामधील कोयीतून तयार होणारी काही वृक्षरोपे नवी मुंबई मधील आम्रवृक्ष संवर्धनासाठी ठेवून उर्वरित साधारणतः लाख संकलित आंबा कोयी ‘रेड एफएम'च्या ‘गुठली रिर्टन्स' या पर्यावरण संवर्धक उपक्रमासाठी दिल्या जाणार आहेत.
नवी मुंबई शहरातील सोसायट्यांमधून तसेच ज्युस सेंटर्स, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स आदी ठिकाणांहून आंब्याच्या कोयी संकलित करण्यासाठी महापालिका द्वारे स्वतंत्र वाहन तयार करण्यात आले असून, आंबा कोयी संकलन मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सुरु करण्यात आलेला आंबा कोयी संकलन उपक्रम पुढील काही दिवस सुरु राहणार आहे.
दरम्यान, नागरिकांनी आंब्याचा आस्वाद घेऊन झाल्यानंतर कोयी ओल्या कचऱ्यात न टाकता एखाद्या भांड्यात स्वच्छ धुवून उन्हात सुकवाव्यात आणि नवी मुंबई महापालिकेच्या विशेष वाहनात वर्तमानपत्रे अथवा बॉक्समध्ये पॅक करुन द्याव्यात, असे आवाहन महापालिका तर्फे करण्यात आले आहे.