मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
मतदानाद्वारे प्राथमिक विद्यार्थ्यांनी निवडले आदर्श विद्यार्थी
नवी मुंबई : लहान वयातच मुलांमध्ये लोकशाही आणि निवडणुक प्रक्रियेचे महत्व रुजावे आणि भविष्यातील जागृत मतदार निर्माण होऊन प्रत्यक्ष मतदानाची टक्केवारी वाढवी, या उद्देशाने वाशीतील ‘मॉडर्न स्कूल'ने राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांमधून मतदान प्रक्रियेद्वारे आदर्श विद्यार्थी निवडण्याचा उपक्रम राबविला. या आगळ्या-वेगळ्या निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
२५ जानेवारी, राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त ‘रयत शिक्षण संस्था'च्या वाशी येथील ‘मॉडर्न स्कूल'च्या मराठी माध्यमाच्या प्राथमिक विभागात चक्क मतदान प्रक्रियेद्वारे आदर्श विद्यार्थांची निवड केली गेली. लहान मुले उद्याचे भवितव्य असून ते उद्याचे मतदार असल्याने लहान वयातच त्यांना लोकशाहीची माहिती व्हावी या उद्देशाने शाळेमध्ये मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.
त्यासाठी प्रत्येक तुकडीतून ६ विद्यार्थ्यांना उमेदवारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे मतदार यादीतील नावे तपासणे, स्वाक्षऱ्या घेणे, ओळखपत्र तपासणे, बोटाला शाई लावणे या निवडणूक कार्यक्रमातील महत्वाच्या प्रक्रिया येथे पार पाडण्यात आल्या. या निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनीही मतदान केले. या निवडणुकीतून इयत्ता चौथीतील मुलींमधुन गौरी चंद्रप्रकाश शिंदे तर मुलांमधून पार्थ मनोज वातेरे असे दोन विद्यार्थी आदर्श विद्यार्थी म्हणून निवडून आले. या विजयी विद्यार्थ्यांची ढोल-ताशाच्या गाजरात वाजत-गाजत मिरवणूक देखील काढण्यात आली.
मुख्याध्यापक रविंद्र वाघ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमासाठी मतदान प्रकिया प्रमुख एन. बी. वामन, शिक्षिका भोसले, राजश्री मॅडम, ठाकूर मॅडम, गावंड मॅडम, लोहकरे, पवार, अर्चना मॅडम, मोरे मॅडम आदिंनी परिश्रम घेतले.