महापालिकेच्या ढिसाळ कामकाजामुळे रहिवाशांमध्ये नाराजी

खारघर मध्ये खड्ड्यात अडकला पाणी टँकर

खारघर : खारघर मध्ये घरगुती गॅस वाहिनीसाठी केलेले खोदकाम पावसाळा पूर्वी पूर्ण न करता पनवेल महापालिकेने अर्धवट सोडल्याने खड्डयात टँकर अडकून पडल्याची घटना खारघर मध्ये घडली. पावसाळा पूर्वी काम पूर्ण करा अशी मागणी रहिवाशांनी करुनही महापालिका प्रशासनाने कुठलीही हालचाल केली नसल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

पनवेल महापालिका द्वारे खारघर सेक्टर-३४, ३५ परिसरात घरोघरी गॅस जोडणीसाठी रस्ते खोदकाम करुन गॅस वाहिनी टाकण्याचे काम महानगर गॅस वाहिनीकडून हाती घ्ोण्यात आले होते. गॅस वाहिनीसाठी रस्त्याच्या कडेला आणि मध्यभागी खोदकाम करुन गॅस वाहिनीचे काम झाल्यावर पावसाळा पूर्वी रस्त्याचे काम करणे आवश्यक होते. तसेच १५ मे पूर्वी पावसाळी पूर्वी कामे पूर्ण करावीत, अशी सूचना महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. खारघर सेक्टर-३४ कडून पेठपाडा स्थानकाकडे जाणाऱ्या मेट्रो पुलाखाली खोदकाम केलेल्या खड्ड्यात दुचाकी पडून व्यवती जखमी झाल्यावर स्थानिक रहिवाशांनी खड्डे बुजविले होते.
दरम्यान, अखेरीस खारघर सेक्टर-३४ मधील रहिवाशांनी महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यावर ठेकेदारांनी काही ठिकाणी थातुर-मातुर काम करुन पलायन केले. आजही खारघर सेक्टर-३४, ३५ मध्ये गॅस वाहिनीसाठी केलेल्या खोदकामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

दरम्यान, खारघर मध्ये अपुरा प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्यामुळे प्रत्येक सोसायटीत रहिवाशांना टँकरद्वारे पाणी घेवून पाण्याची गरज पूर्ण करावी लागत आहे. २७ जून रोजी सायंकाळी रस्त्यावरील खड्डयात टँकर अडकून पडल्याने टँकर बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. रस्त्यावर खड्डे असल्यामुळे टँकर येण्यास मनाई करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत पनवेल महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कटेकर यांच्याशी संपर्क केला असता होवू शकला नाही. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एकत्रित सेवाप्रवेश नियमावली मंजूर