महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे तातडीने लागू करावेत -गृहमंत्री अमित शाह
नमुंमपा विद्यार्थ्यांचे एसएससी परीक्षेत उज्वल यश
नवी मुंबई: माध्यमिक शालांत (एस.एस.सी.) परीक्षा-२०२४चा निकाल जाहीर झाला असून नवी मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेले आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधून नमुंमपा माध्यमिक शाळा क्र.११६, सानपाडा येथील विद्यार्थिनी पुजा शिवाजी वंजारे ९४ टक्के इतके सर्वाधिक गुण मिळवून महापालिका शाळांमध्ये सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे.
नमुंमपा माध्यमिक इंग्रजी शाळा क्र.१२०, दिवागाव येथील वैष्णवी रमेश राठोड ९३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय नमुंमपा माध्यमिक शाळा क्र.१०४, राबाडा येथील विद्यार्थिनी निहारिका वर्मा आणि अर्पिता यादव त्याचप्रमाणे माध्यमिक इंग्रजी शाळा क्रमांक.१२०, दिवागांव येथील विद्यार्थी स्वहम पीतांबर पात्रा या तिन्ही विद्यार्थ्यांनी ९१.६० टक्के गुण संपादन करीत नवी मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांतून संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळविला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्या एकूण २३ माध्यमिक शाळांमधून २८१२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २६७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महापालिकेच्या माध्यमिक शाळांचा एकूण सरासरी निकाल ९३.६१ टक्के एवढा लागला आहे. महापालिकेच्या २३ माध्यमिक शाळांमधून शाळा क्र.११६ सानपाडा, शाळा क्र.११८ पावणेगांव, शाळा क्र.१२२ कोपरखैरणे गांव या ३ शाळांचा निकाल १०० टक्के आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये दिले जाणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण व्हिजन एस.एस.सी. परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या गुणात्मक यशातून पुन्हा एकवार सिध्द झाले आहे. एस.एस.सी. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक सुविधा आणि शैक्षणिक दर्जा याबाबत पालकांमार्फत समाधान व्यक्त करण्यात आले आहे.