वाशी प्लाझा उड्डाणपुलावर ट्रेलर पलटी  

नवी मुंबई : मुंबईहुन अवजड क्वाईल घेऊन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर ट्रेलर क्वॉईलसह उलट्या दिशेला सायन-पनवेल मार्गावरील वाशी प्लाझा उड्डाणपुलावरील मुंबई लेनवर पडल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघातामुळे ऐन सकाळच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारी उड्डाणपुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांनी हायड्रा क्रेनच्या सहाय्याने अपघाताग्रस्त ट्रेलर आणि अवजड क्वॉईल उचलून बाजुला काढल्यानंतर सकाळी १०.३० नंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु झाली.  

या घटनेतील अपघातग्रस्त ट्रेलर २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून अवजड क्वाईल घेऊन पुण्याच्या दिशेने जात होती. सदर ट्रेलर सायन-पनवेल मार्गावरील वाशी प्लाझा येथील उड्डाणपुलावर आला असताना ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे सदरचा ट्रेलर मुंबई लेनवर अवजड क्वाईलसह पलटी झाला. या अपघातामुळे उड्डाणपुलावरुन मुंबईच्या दिशने जाणारी वाहतूक ठप्प होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाशी वाहतूक पोलिसांनी उड्डाणपुलावरील वाहतूक खालील मार्गाने वळवल्याने मुंबईच्या दिशने जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु होती.  

यादरम्यान, वाहतुक पोलिसांनी सकाळी १० च्या सुमारास हायड्रा क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रेलर आणि क्वॉईल उचलून बाजुला काढून उड्डाणपुलावरील वाहतूक सुरळीत केली. मात्र, ऐन सकाळच्या सुमारास घडलेल्या या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळासाठी ठप्प होऊन नंतर ती संथ गतीने सुरु राहिल्याने विविध वाहनांतून कामासाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या नागरिकांना याचा चांगलाच फटका बसला. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

ग्राहकाने चलाखीने केलेली ८ लाखांची वीज चोरी उघड