ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
नाल्यात निळे पाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई
कल्याण ः एमआयडीसी मधील निवासी भागातील नाल्यातून निळे पाणी वाहत असल्याचा प्रकार २ एप्रिल रोजी उघडकीस आला होता. पाण्यात केमिकल सोडल्याने पाणी निळे झाल्याचा आरोप झाला असताना ३ एप्रिल रोजी ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ' कल्याण आणि ‘केडीएमसी'चे अधिकारी यांनी संयुक्तपणे सोनारपाडा, माणगाव येथील जीन्स धुण्याच्या तसेच साबण, ॲसिड बनविणाऱ्या कारखान्यांसह भंगार गोदामांवर कारवाई केली.
एमआयडीसी विभागातील प्रदुषणााचा त्रास स्थानिकांना अधून-मधून होत असतो. याआधी रस्ते गुलाबी होणे, हिरवा पाऊस पडणे तसेच नाल्यामधून निळे पाणी वाहण्याचे प्रकार घडले असताना पुन्हा एकदा २ एप्रिल रोजी येथील निवासी भागातील नाल्यामधून निळे पाणी वाहिले होते. रासायनिक कंपन्यांनी केमिकल सोडल्याने नाल्यातील पाणी निळे झाल्याचा आरोप ‘मनसे'ने केला होता. तर कल्याण प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि ‘केडीएमसी'च्या अधिकाऱ्यांनी निळे पाणी कशामुळे वाहतेय? याचा तपास सुरु केला होता.
दरम्यान, या शोध मोहिमेत ‘कल्याण प्रदुषण नियंत्रण मंडळ'चे अधिकारी उपेंद्र कुलकर्णी, ‘केडीएमसी'चे ई-प्रभाग सहाय्यक आयुक्त भारत पवार आणि ‘कामा संघटना'चे देवेन सोनी सहभागी झाले होते. यावेळी ललित काटा सोनारपाडा येथे बंद पडलेल्या बेकरीमध्ये जीन्स धुण्याचा कारखाना चालू असल्याचे निदर्शनास पडले. येथूनच निळे पाणी वाहत होते. साबण आणि ॲसिड बनविणाऱ्या अशा २ फॅक्टरी माणगाव परिसरात चालू असल्याचेही आढळून आले. त्यामुळे कारखाने आणि दोन्ही फॅक्टरी सील करण्यात आली आहेत.
सोनारपाडा येथील भंगाराची ८ गोदामे देखील सदर कारवाईत तोडण्यात आली. यापुढेही अवैध कारखाने, फॅक्टरी आणि भंगार गोदामांवर कारवाई सुरुच राहील, अशी माहिती महापालिका ई-प्रभाग सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी दिली.