राज्यात उद्योगांना गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : महाराष्ट्रातील उद्योगांना चालना मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ'च्या ठाणे मधील कार्यक्रमाप्रसंगी केले.

‘एमआयडीसी'च्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-४२ येथे बहुस्तरीय वाहनतळाच्या इमारतीचा भूमीपुजन समारंभ आणि ‘मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजना'चा (मेडिक्लेम पॉलिसी) शुभारंभ ९ फेब्रुवारी रोजी ठाणे मधील हॉटेल टिप-टॉप प्लाझा येथे संपन्न झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

याप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, माजी आमदार रविंद्र फाटक, ‘एमआयडीसी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, विजय राठोड, ‘एमआयटीएल'चे व्यवस्थापकीय संचालक र्श्मल्लिकनेर, स्थानिक पदाधिकारी आदि उपस्थित होते.

राज्यात उद्योगांना चालना मिळण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध पाहिजेत. राज्यात उद्योगांना गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे. आपल्या राज्यात जास्तीत जास्त उद्योग आले पाहिजेत, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. उद्योगांना सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. युती सरकार गतिमान सरकार आहे. आपण सर्वांनी गतिमानतेने कामे केली पाहिजेत. आज महाराष्ट्र ‘एफडीआय'मध्ये क्रमांक १ चे राज्य आहे. उद्योगांसाठी असलेली ध्येय-धोरणे सुटसुटीत असली पाहिजेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

‘एमआयडीसी'च्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-४२ येथे बहुस्तरीय वाहनतळ इमारतीमध्ये पाकर्िंग व्यवस्था वाढविली पाहिजे. ‘एमआयडीसी'तील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या इयत्ता ८ वी ते १० वी मधील पाल्यांला दरवर्षी टॅबचे वाटप करण्यात येणार आहे. ‘एमआयडीसी'तील ४५० अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. ‘एमआयडीसी'मधील अधिकारी-कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजना (मेडिक्लेम पॉलिसी) सुरु करण्यात आली. सदरचा एक चांगला उपक्रम ‘एमआयडीसी'ने राबविला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

राज्यात कॅशलेस आरोग्य सेवा पूर्ण राज्यभर करण्यात येणार आहे. ‘शासन आपल्या दारी' या उपक्रमातून शासनाच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत २.०८ कोटी लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे. प्रशासन याच्यासाठी दिवसरात्र काम करीत आहे. एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहायला नको, यासाठी सर्वजण काम करीत आहेत. स्वच्छता मोहिमेमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधी मधून गरजु रुग्णांना आतापर्यंत २.५० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

यावेळी उद्योग मंत्री श्री.सामंत म्हणाले की, ‘एमआयडीसी'साठी आजचा दिवस एैतिहासिक आहे. गेले १६ महिने महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबर वर आला आहे. सदर सर्व ‘एमआयडीसी'च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे शक्य झाले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मागणी करण्याअगोदरच त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. ठाण्यात पार्किंगची व्यवस्था व्हावी आणि ट्रॅफिक पासून मुक्ती मिळावी, यासाठी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-४२ येथे बहुस्तरीय वाहनतळ व्हावे, असा मुख्यमंत्री महोदयांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. यासाठी ३४ कोटी रुपये खर्च करुन सर बहुस्तरीय वाहनतळ पूर्ण करण्यात आले आहे, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
यावेळी ना. उदय सामंत यांच्या हस्ते ‘एमआयडीसी'मधील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना देण्यात येणाऱ्या ३५० टॅब पैकी प्रातिनिधीक स्वरुपात काही पाल्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. यापुढे दरवर्षी अधिकारी-कर्मचारी यांच्या इयत्ता ८ वी ते १०वी मधील पाल्यांना टॅब वाटपाचे धोरण जाहीर करण्यात आले. ४५० अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. महामंडळातील अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजना (मेडीक्लेम पॉलिसी) सुरु करण्यात आली. या विम्याचे हप्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरणार आहे, असे ना. सामंत म्हणाले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘एमआयडीसी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा यांनी केले. यावेळी त्यांनी ‘एमआयडीसी'च्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-४२ येथील बहुस्तरीय वाहनतळाविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने आणि दिपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मानसी सोनटक्के यांनी केले. यावेळी ‘एमआयडीसी'चे अधिकारी-कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई मधील पर्यावरण प्रेमींना फुले, फळे झाडे प्रदर्शनाची प्रतीक्षा