महावाचन उत्सवात 5 हजाराहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी अधोरेखित केले पुस्तकांचे महत्व
पनवेल मध्ये ३३ अनधिकृत होर्डिंग
पनवेल : मुंबईमधील घाटकोपर येथील जाहिरात फलक दुर्घटनेनंतर पनवेल महापालिकेने देखील आपल्या हद्दीतील अनधिकृत जाहिरत फलकांच्या विरोधात मोहिम सुरु केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून महापालिका क्षेत्रातील सर्व जाहिरत फलकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये कामोठे मध्ये २, कळंबोली मध्ये ३, पनवेलमध्ये १, उपविभागीय नावडे येथे २७ अनधिकृत जाहीरात फलक असल्याचे आढळून आले आहेत. तर खारघर मध्ये एकही अनधिकृत जाहिरत फलक आढळून आलेले नाहीत. यामधील ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर महापालिकेच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
घाटकोपर येथील जाहिरत फलक दुर्घटनेनंतर आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १७ मे पासून अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
महापालिका कार्यक्षेत्रात महापालिकेची रितसर परवानगी घेतलेले ८७ अधिकृत जाहिरात फलक आहेत. या सर्व जाहीरात फलक धारकांना महापालिका कडील नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनिअर्स कडून स्थिरता संरचनात्मक लेखा परीक्षण प्रमाणपत्र (स्ट्रवचरल ऑडीट प्रमाणपत्र) घेण्याविषयीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
सध्या महापालिकेच्या वतीने चारही प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत अनधिकृत जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून यामध्ये अनधिकृत जाहिरात फलकांची संख्या ३३ एवढी आहे. महापालिका उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या निर्देशानुसार या अनधिकृत जाहीरात फलकांवर प्रभाग कार्यालयातर्फे निष्कासन कारवाईस सुरुवात झाली आहे
यापुढे महापालिका कार्यक्षेत्रातील जाहीरात फलकांवर महापालिकेचे बारिक लक्ष असणार आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात अनधिकृत जाहिरात फलक आढळल्यास महापालिकेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येईल. -डॉ. प्रशांत रसाळ, आयुवत-पनवेल महापालिका.