मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
उरण मधील २५ हजार रहिवाशी पिताहेत अशुध्द पाणी
उरण : ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण'मधील अभियंत्यांच्या डोळेझाक कारभारामुळे उरण पूर्व विभागातील २५ हजार रहिवाशांना अशुध्द पाणी पुरवठ्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याला धोकादायक ठरु शकतो, अशी भिती रहिवाशी व्यक्त करत आहेत.
‘उरण'च्या पूर्व विभागातील पुनाडे, वशेणी, कडापे, सारडे, पिरकोण, पाणदिवे, पाले, गोवठणे, आवरे, भंगारपाडा या १० गावांना पुनाडे धरणातून ‘आठ गांव पाणी पुरवठा कमिटी'च्या माध्यमातून मार्फत पाणी पुरवठा केला जातो. मे महिन्यात पुनाडे धरणाची पाणी पातळी खालावत असल्याने या परिसरातील रहिवाशांना शुध्द मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने सुमारे १०.८९ कोटी रुपये खर्चाची २०२२ ते २०२४ या कालावधीत पुनाडे नळ पाणी पुरवठा योजना ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण'च्या देखरेखीखाली राबविण्याचा निर्णय घेतला.
मात्र, ‘एमजेपी'चे शाखा अभियंता तथा उपअभियंता प्रशांत पांढरपट्टे यांच्या डोळेझाक कारभारामुळे ‘पाणी पुरवठा योजना'चा ठेका घेणारे कंत्राटदार मे. गोरुर इन्फ्रा प्रा.लि. कंपनीने गावोगावी पाईप लाईनची कामे, जलकुंभ,जलशुध्दीकरण प्रकल्पाची कामे संथ गतीने सुरु ठेऊन खर्चाच्या निधीतून रक्कम वसूल करण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे सदर गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून सध्या अशुध्द पाणी पुरवठ्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे सदर प्रकार रहिवाशांच्या आरोग्याला धोकादायक ठरु शकतो, अशी भिती रहिवाशी सध्या व्यक्त करीत आहेत.
यासंदर्भात ‘जीवन प्राधिकरण'चे शाखा अभियंता प्रशांत पांढरपट्टे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ठेकेदाराची पाठराखण करण्याचे काम केले.
धरणाच्या पाण्याने आधीच तळ गाठला आहे. जल शुध्दीकरणाच्या दुरुस्तीचे काम ठेकेदारांनी हाती घेतले आहे. सध्या रहिवाशांना पाणी फिल्टर होऊन येत नसल्याने ते गढूळ येत आहे. मात्र, याकडे शासन जाणून-बुजून दुर्लक्ष करीत आहेत. -प्रसाद पाटील, माजी सरपंच, वशेणी.
‘पुनाडे नळ पाणीपुरवठा योजना'च्या माध्यमातून उरण पूर्व विभागातील रहिवाशांना अशुध्द पाणी पुरवठा सुरु आहे की नाही, याची माहिती घेऊन कळविण्यात येईल.
-समीर वाठारकर, गटविकास अधिकारी - उरण पंचायत समिती.