ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
सर्वंकष स्वच्छता मोहिमेला माजिवडा-मानपाडा विभागात उत्स्फुर्त प्रतिसाद
ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सर्वंकष स्वच्छता मोहिम (DeepCleaning Campaign) २० जानेवारी रोजी माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात राबविण्यात आली. या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसोबतच महापालिका अधिकारी-कर्मचारी तसेच स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या स्वच्छता मोहिमेत प्रभागातील सफाईसोबतच मंदिरे तसेच मंदिर परिसरही झाडलोट करुन पाण्याने स्वच्छ करण्यात आला. दरम्यान, सर्वंकष स्वच्छता मोहिम व्यक्तीपासून समुहापर्यंत सुरु ठेवली तरी निश्चितच ठाणे शहर प्रदुषणमुक्त होईल, असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी यावेळी व्यक्त केला.
सदर मोहिमेत आमदार संजय केळकर यांच्यासह माजी नगरसेवक संजय भोईर, माजी नगरसेविका कविता पाटील, कमल चौधरी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, दिनेश तायडे, अनघा कदम तसेच महापालिकेचे सर्व अधिकारी सहभागी झाले होते.
केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार सदर मोहिम संपूर्ण देशभर सुरु आहे. ठाणे येथेही महापालिकेच्या माध्यमातून देखील शहरात सर्वंकष स्वच्छता अभियान सुरु आहे. स्वच्छता मोहिम केवळ एक दिवसाची नसून ती अनेक दिवसांपासून सुरु असून यापुढे देखील सुरु राहणार आहे. शहर स्वच्छ असले की वातावरण देखील प्रदुषणमुक्त असते. माणसाचे मन देखील स्वच्छ राहते. महात्मा गांधीजींनी सुुरु केलेल्या सदर मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चळवळीचे स्वरुप दिले आहे. त्यामुळे सदर मोहिम प्रत्येक व्यक्तीपासून समुहापर्यंत सुुरु ठेवली तर निश्चितच आपले ठाणे शहर प्रदुषणमुक्त होईल, असा विश्वास आ. संजय केळकर यांनी व्यक्त केला.
स्वच्छता मोहिम माजिवडा-मानपाडा या ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वात मोठ्या प्रभाग समितीत राबविण्यात आली. सकाळी ६.३० वाजल्यापासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. माजिवडा-नाशिक हायवे, साईनाथनगर लोढा कॉम्प्लेक्स, यशस्वीनगर प्रभाग समिती ते शिवाजीनगर, दादलानी बाळकुम नाका ते साकेत रोड, ढोकाळी, हायलॅण्ड रोड ते राममारुती नगर, कोलशेत लोढा आमारा, कोलशेत वरचा गाव, तत्वज्ञान विद्यापाठी, पातलीपाडा, मानपाडा, मनोरमा नगर ढोकाळी, आझादनगर, ब्रह्मांड-काबरासर्कल, पातलीपाडा-इंदिरापाडा, डोंगरीपाडा-वामननगर, तुर्फेपाडा, बाघबीळ गांव रोड, वाघबीळ नाका, कासारवडवली, ओवळा, भाईंदरपाडा, गायमुख, जैनमंदिर, गरीबनगर ओवळा, भाईंदरपाडा-नागलाबंदर, गायमुख, तानसा पाईपलाईन तसेच या परिसरातील नाले तसेच परिसरातील सर्व अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांची झाडून साफसफाई करण्यात आली. तसेच रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आले.
माजिवडा-मानपाडा क्षेत्रात सर्व प्रमुख रस्ते, मैदाने, तलाव, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, बस डेपो, मंदिर आणि परिसर, गणेश विर्सजन घाट, चौपाटी, पलायओव्हर खालील भाग, आदि ठिकाणी देखील सफाई करण्यात आली. याचबरोबर मंदिर स्वच्छता अभियानही राबविण्यात आले. यावेळी शिवमंदिर, आशापुरा देवी मंदिर, राम मंदिर, नंदीबाबा मंदिर आदी मंदिरे तसेच मंदिराचा परिसर झाडलोट करुन पाण्याने स्वच्छ करण्यात आला. तसेच रस्त्यावर उभी असलेली सुमारे १७ भंगार वाहनेही हटविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत मंदिराच्या सफाईसाठी विहिरींचे पाणी वापरण्यात आले. तर रस्ते सफाईसाठी जेटींग मशीन करता पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात आला.
या मोहिमेत महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्यान विभाग, विविध सामाजिक संस्था तसेच एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांचाही सहभाग होता.