रस्ते खोदकामामुळे पावसाळ्यात खारघर मध्ये ‘वाहतुक कोंडी'ची शक्यता

खारघर : खारघर शहरातील मुख्य रस्त्यांवर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. खारघर मधील वर्दळीच्या रस्त्यांवरील चौक आणि सर्कल मधील रस्त्यांवर खोदकाम करुन पनवेल महापालिका तर्फे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम केले जात आहे. विशेष म्हणजे सदर  काम पावसाळ्यातही सुरु राहणार असल्यामुळे खारघर शहरातील वाहतुक कोंडीत भर पडणार आहे. त्यामुळे महापालिकेने पावसाळ्यात रस्ते खोदकाम करु नये, अशी मागणी खारघर शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.  

पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यावर प्रथमच महापालिका द्वारे खारघर वसाहत मधील मुख्य चौक आणि सर्कल येथील वळणाच्या रस्त्याचे खोदकाम करुन सिमेंट काँक्रिटीकरण केले जात आहे. खारघर मधील हिरानंदानी चौक, खारघर सेक्टर-१९ मुर्बी गाव सर्कलमध्ये सिमेंट काँक्रिटीकरणचे काम सुरु आहे. वर्दळीचा सर्कल म्हणून ओळखल्या  जाणाऱ्या ग्रामविकास भवन समोरील सर्कल मध्ये रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात रस्ते खोदकाम न करण्याच्या शासनाच्या सूचना असताना पावसाळ्यात सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम दर्जेदार होते, असा उद्देश समोर ठेवून पुढील   काही दिवसात खारघर मधील उत्सव आणि शिल्प चौक, बँक ऑफ इंडिया तसेच तवा हॉटेल समोरील सर्कल, खारघर सेक्टर-१५ आणि इतर काही सर्कल भागातील रस्ते खोदकाम करुन चौक आणि सर्कल भागाचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.  

खारघर मधील हिरानंदानी चौक ते ग्रामविकास भवन मार्गे तळोजाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या मुख्य रस्त्यावरील सर्कल भागाचे ऐन पावसाळ्यात काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्यामुळे खारघर मधील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

हिरानंदानी चौक मार्गे तळोजाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रोज शेकडो वाहने धावतात. याशिवाय तळोजा आणि खारघर मधील नागरिक नोकरी आणि व्यवसाय निमित्त ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा उपयोग करतात. या रस्त्यावर एनएमएमटी बसेस तसेच अनधिकृत प्रवासी वाहने धावत असतात. विशेष म्हणजे पावसाळ्यात पांडवकडा धबधबा खाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी मुंबई,नवी मुंबई आणि पनवेल परिसरातून पर्यटक वाहने घ्ोवून येतात. त्यामुळे पावसाळ्यात रस्ते खोदकामामुळे खारघर मध्ये वाहतुक कोंडी होण्याची शवयता खारघर शहरातील नागरिकांकडून वर्तविली जात आहे.

खारघर आणि तळोजा परिसरात घरोघरी  गॅस वाहिनी टाकण्यासाठी रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले आहे.  खोदकाम केलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच मागील वर्षी पावसाळ्यात रस्त्यालगत असलेल्या खड्डयात दुचाकी घसरुन एका ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला होता. पनवेल महापालिकेने खारघर मधील खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास पावसाळ्यात किरकोळ अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

हिरानंदानी चौककडून खारघर वसाहत तसेच उत्सव चौक, सेंट्रल पार्क रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. पावसाळ्यात रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केल्यास खारघर शहरातील रस्त्यावरील वाहतुक कोंडीत भर पडणार आहे. त्यामुळे पनवेल महापालिका पावसाळ्यात रस्ते खोदकाम करणार नाही, अशी अपेक्षा आहे. - संतोष काणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक - वाहतुक नियंत्रण शाखा, खारघर.  
 
पावसाळ्यात रस्त्यांवर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम करताना वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. याशिवाय अतिवृष्टीच्या वेळी रस्ते खोदकाम बंद ठेवण्यात येणार आहे. संजय कटेकर, कार्यकारी अभियंता - पनवेल महापालिका.

खारघर वसाहत मधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. दुरवस्था झालेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याऐवजी खारघर मधील सर्कल, चौक आदी ठिकाणी असलेले चांगले रस्ते खोदून रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जात आहे. पनवेल महापालिका अधिकारी स्वतःच्या मनाप्रमाणे काम करीत आहेत. - केशरीनाथ पाटील, रहिवाशी तथा पदाधिकारी - महाराष्ट्र नवनिर्माण सेना, खारघर. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मतमोजणीच्या अनुषंगाने आज अवजड वाहनांना अटल सेतूवरून जाण्यास मनाई