ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
मतदान जनजागृतीसाठी ‘मिनी मॅरेथॉन'चे आयोजन
ठाणे : येत्या २० मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे याबद्दल जागृती करण्यासाठी ठाणे येथे ११ मे रोजी सकाळी ‘मिनी मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन्स फाऊंडेशन यांचा सदर संयुक्त उपक्रम असून जास्तीत जास्त धावपटुंनी या ‘मॅरेथॉन'मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ठाणे महापालिका तर्फे ‘स्वीप'अंतर्गत विविध उपक्रम हाती घ्ोतले आहेत. रविवारला जोडून मतदानाची सुट्टी आली असली तरी नागरिकांनी मतदान करणे चूकवू नये यासाठी वारंवार जागृती केली जात आहे. या मतदानाची आठवण करुन देण्यासाठी ‘धावा आणि मतदान करा' असा संदेश देणारी मिनी मॅरेथॉन ११ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. या ‘मॅरेथॉन'मध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे आणि मतदानाचा संदेश घरोघरी पोहोचवावा, असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
११ मे रोजी सकाळी ६.३० वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर या ‘मिनी मॅरेथॉन'ला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि महापालिका आयुक्त सौरभ राव हिरवा झेंडा दाखवतील. या ‘मॅरेथॉन'मध्ये १२ वर्षावरील, १५ वर्षाखालील, १८ वर्षाखालील, १८ वर्षांपेक्षा मोठे, तृतीयपंथीय असे गट करण्यात आले आहेत. ‘मॅरेथॉन'चा पारितोषिक वितरण समारंभ घाणेकर सभागृहात होणार आहे.
‘मिनी मॅरेथॉन'मधील सहभागासाठी नोंदणी करण्याकरिता लिंक - http://thanecitizens.org/mini-marathon-registration/