‘ग्रीन होप'तर्फे वृक्षारोपणाने पर्यावरण दिन साजरा

नवी मुंबई : माजी आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वात नवी मुंबईमध्ये गेल्या १९ वर्षांपासून पर्यावरण संवर्धनामध्ये भरीव काम करीत असलेल्या ‘ग्रीन होप'तर्फे  विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करुन जागतिक पर्यावरण दिन उत्साहात  साजरा करण्यात आला. रबाले, नेरुळ आणि सीवुडस्‌ या ठिकाणी आमदार गणेश नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरणप्रेमी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘पर्यावरण रक्षण'चा संदेश देण्यासाठी  जागृती फेरी देखील काढण्यात आली. निसर्गाशी मानवाने आजवर केलेल्या खेळामुळे उष्णतेची लाट, पूर, दुष्काळ अशी संकटे ओढवली आहेत, असे मत आ. गणेश नाईक यांनी मांडले. आपली चूक सुधारुन झाडे लावून ती झाडे जगवावीत, असे आवाहन त्यांनी केले. जल,  वायू आणि ध्वनी प्रदुषण करणाऱ्या घटकांचा वापर करणार नाही, असा संकल्प करण्याचा सल्ला देखील त्यांनी उपस्थितांना दिला.

जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये ‘ग्रीन होप'च्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेत वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती, खारफुटींचे रोपण, मागेल त्याला झाड असे अनेक उपक्रम राबविल्याची माहिती  दिली.

पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण केलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी मोठा बदल घडवू  शकतात.  मी प्लास्टिक वापरणार नाही, प्रदुषणकारी कचरा करणार नाही, असे प्रत्येकाने ठरवावे. नवी मुंबईची लोकसंख्या वाढत असताना  नवी मुंबईतील हिरवळ आणि  झाडांची संख्या देखील वाढली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने, संस्थेने झाडे लावावीत आणि ती जगवण्याची जबाबदारी उचलावी, असे आवाहन संदीप नाईक यांनी केले. गुणवत्तापूर्ण  वृक्षारोपण आणि झाडांचे जतन गरजेचे आहे. ‘मागेल त्याला झाड' उपक्रम वर्षभर राबवून नवी मुंबईत वृक्षारोपण चळवळ गतिमान करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल मध्ये महापालिका तर्फे ११०० वृक्षांचे रोपण