‘जागतिक मातृदिन'निमित्त स्वच्छतासखींची आरोग्य तपासणी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि आरोग्यम्‌ सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जागतिक मातृदिन'चे औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात ‘सन्मान मातृत्वाचा, स्वच्छतासखींचा आरोग्याचा' या शिर्षकांतर्गत आयोजित स्वच्छतासखींच्या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अतिरिवत आयुवत सुनिल पवार, ‘घनकचरा व्यावस्थापन विभाग'चे सहा.आयुक्त जयंत जावडेकर, ‘आरोग्यम्‌ संस्था'च्या प्रमुख शमिका सुतार, डॉ. राहुल वडके उपस्थित होते.

स्वच्छतेच्या माध्यमातून नवी मुंबई शहराच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या स्वच्छतासखींच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने ‘जागतिक मातृदिन'चे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी ‘आरोग्यम्‌ संस्था'ने पुढाकार घेऊन स्वच्छताकर्मींविषयी आपुलकी दाखवत सदर शिबीर आयोजित केल्याबद्दल अतिरिवत आयुवत सुनिल पवार यांनी गौरवोद्‌गार काढले.

स्वच्छताकर्मी एक प्रकारे शहराचे आरोग्यसैनिक असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची जपणूक करणे कर्तव्य असून त्यादृष्टीने तसेच ‘घरातील स्त्री निरोगी असेल तर घर सुखी' या भूमिकेतून आपल्या आईबद्दल मनात असलेली कृतज्ञतेची भावना स्वच्छतासखींची आरोग्य तपासणी करुन व्यक्त होत असल्याचे पवार म्हणाले.

यावेळी उपस्थित शंभराहून अधिक स्वच्छतासखींची रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन पातळी अशी विविध प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात आली. १५ आणि १६ जून रोजी आरोग्यम्‌ मार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या मोठ्या स्वरुपातील आरोग्य शिबीरात पुढील चाचण्या करणे गरजेचे असलेल्या स्वच्छतासखींच्या आवश्यक चाचण्या केल्या जाणार आहेत.

यावेळी उपस्थित महिलांना व्यक्तिगत स्वच्छता आणि आरोग्याविषयी नामांकित आरोग्य तज्ञ डॉ. राहुल वडके यांनी मार्गदर्शन केले. ‘आरोग्यम्‌'च्या प्रमुख शमिका सुतार यांनी नवी मुंबई शहराविषयी कृतज्ञता म्हणून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून स्वच्छतासखींसाठी मातृदिनानिमित्त नवी मुंबई महापालिकेच्या सहकार्याने आरोग्य शिबीराचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले. 

Read Previous

क्लाऊड नाईन रुग्णालयाला महापालिकेची नोटीस