आषाढी एकादशीस मंत्रोच्चारांच्या घोषात पूजले वृक्षांना

युथ कौन्सिल, नेरुळच्या पुढाकाराने वृक्षपूजन, वृक्षारोपण

नवी मुंबई : गेली पस्तीस वर्षे नवी मुंबईत कार्यरत असलेल्या युथ कौन्सिल, नेरुळ या संस्थेच्या पुढाकाराने २९ जून रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून नेरुळ येथील सावली रोपवाटिकेत सालाबादप्रमाणे वृक्षपूजन व वृक्षारोपण शुभारंभ सोहळ्याचे आयोजन आर सी एफ लि. हरित प्रकल्प चेंबूर या प्रकल्पांतर्गत व श्री गजानन महाराज भवत मंडळ, वाशी यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. या प्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगर सचिव सौ चित्रा बाविस्कर, वास्तु ज्योतिष तज्ञ पं. जितेंद्र कुलकर्णी, नमुंमपा.शाळेचे मुख्याध्यापक अशोकराव सोनावणे, दै. आपलं नवे शहरचे उपसंपादक राजेंद्र घरत यांच्या हस्ते रोपट्यांचे पूजन करुन तेथे त्यांचे रोपण करण्यात आले. यावेळी पं.जितेंद्र कुलकर्णी यांनी मंत्रोच्चाराने वातावरण शुचिर्भूत केले.

युथ कौन्सिलचे हे अखंडपणे चाललेले काम प्रशंसनीय असून वृक्षारोपण करण्यासारखे पुण्य नाही, असे नमूद करुन नगरसचिव सौ.चित्रा बाविस्कर यांनी झाड लावा रं गड्या झाडं लावा असे आग्रहपूर्ण आवाहन करणारी कविता सादर केली. नर्मदा परिक्रमा करणारे साहित्यिक दिलीप जांभळे, नवी मुंबईतील महापालिका शाळांपैकी रबाळे येथील छत्रपती शाहु महाराज पालिका शाळेची यंदाच्या शालान्त परिक्षेत ९३.८० % गुण मिळवून पहिली आलेली कु. गायत्री योगी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आपण युथ कौन्सिलशी गेली पंचवीस वर्षाहुन अधिक काळ जोडले गेल्याचा आनंद असून वय, अनुभव, सामाजिक पत, प्रतिष्ठा वगैरे सारे विसरुन निरपेक्ष भावनेने व केवळ सेवाभावी वृत्तीने काम करत असलेल्या युथ कौन्सिलच्या सदस्यांचे सरासरी वय वर्षे सत्तरच्या  पुढे असूनही ते सारे सत्तावीस वर्षे वयाच्या तरुणाप्रमाणे काम करतात हे आपणास भावत असल्याचे राजेंद्र घरत यांनी आपल्या भाषणात सांगितले व या संस्थेचे तसेच पालिकेच्या शाळेत शिकुनही चांगल्या गुणांची कमाई केलेल्या गायत्री सिंग हिच्या मेहनतीचे कौतुक केले. युथ कौन्सिल, नेरुळचे सचिव सुभाष हांडेदेशमुख यांनी आपली  संस्था ही जात, धर्म, राजकीय विचारसरणीच्या पलिकडे जाऊन काम करीत असल्याने इतवया वर्षात विविध मान्यवरांनी सहकार्य केल्याचा आढावा घेतला व ५ नोव्हेंबरला शांतिवन नेरे येथील कुष्ठरोग्यांसमवेत सारे सदस्य दिवाळी साजरी करणार असल्याची घोषणा केली. यावेळी शिवाजीराव शिंदे, अशोकराव महाजन, नरेश विचारे, गोपाळराव देऊळकर, दत्ताराम आंब्रे, भालचंद्र माने, यशवंत गोनेवाड, निशांत बनकर, रविंद्र करमळकर, सौ. रुचिता कर्पे, सिमा आगवणे, अरविंद वाळवेकर आदिंनी उत्साही उपस्थिती दर्शवली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 शहरातील पाणी साचणाऱ्या सखल भागांची आयुक्तांनी केली पाहणी