घारापुरी लेणीतील शिवपिंडीच्या पुजेचा अधिकार द्या

उरण : युनोस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेली मुंबईजवळील घारापुरी बेटावर ‘घारापुरी लेणी' (एलिफंटा लेणी) भगवान शिवाचे प्राचीन स्थान आहे. हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा आणि धार्मिक स्थळ असलेल्या घारापुरी येथे हिंदुंना पुजेचा अधिकार मिळावा, यासाठी हिंदु संघटनांनी जनआंदोलन करत केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.

यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, हिंदु जनजागृती समिती आणि ‘सुदर्शन वाहिनी'च्या पुढाकाराने घारापुरी येथील शिवपिंडीची प्रतिकात्मक पुजाअर्चा केली. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक'चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, ‘हिंदु जनजागृती समिती'चे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आणि ‘सुदर्शन वाहिनी'चे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांनी या ‘जनआंदोलन'चे नेतृत्त्व केले. या पुजाविधीसाठी ‘घारापुरी'चे उपसरपंच बळीराम ठाकूर यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून हातात भगवे ध्वज घेऊन हर हर महादेव, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत धर्मप्रेमींनी घारापुरी लेणीकडे प्रयाण केले. येथील शिवपिंडीला गंगाजलाने अभिषेक आणि पुष्प अर्पण करून सामुहिक आरती करण्यात आली. या ठिकाणी शिवस्तोत्राचे पठण करुन हिंदूंनी ‘हर हर महादेव'चा जयघोष केला.

घारापुरी येथील लेणी ६-८ व्या शतकाची असल्याचे मानले जाते. येथील लेणी म्हणजे भारतीय शिल्पकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना मानला जातो. येथे ५ गुंफांचे समूह असून या सर्व गुंफांमध्ये शैवलेणी कोरण्यात आली आहेत. पोर्तुगीजांच्या काळात या शिल्पांची तोडफोड केली गेली. ब्रिटीशांच्या काळात या शिल्पांवर गोळीबारीचा सराव करण्यात आला. त्यामुळे सद्यस्थितीत येथील बहुतांश शिल्पे भग्न झाली आहेत. घारापुरी लेणी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असून येथील शिवपिंडीची पुजाअर्चा बंद आहे.

‘केंद्रीय संसदीय समिती'च्या अहवालानुसार पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असलेल्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पुजा करण्याची अनुमती देण्यात आली आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाने जर त्यांच्या अखत्यारितील धार्मिक ठिकाणी पुजेची अनुमती दिली असेल, तर राज्यांनाही ती देण्यास काहीच हरकत नाही. जगन्नाथपुरी येथे कोणार्क सूर्यमंदिरात हिंदुंना पुजेचा अधिकार नाही. सूर्यदेवाची मूर्ती समोर असूनही हिंदुंना पुजा करता न येणे, एकप्रकारचा अन्यायच आहे. -रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रववते-हिंदु जनजागृती समितीे.

घारापुरी येथील लेणी आमची संस्कृती आहे. कुणासाठी ती श्रध्दास्थाने असतील, तर कुणासाठी पुजास्थाने असतील. दृष्टीकोन वेगवेगळे असू शकतात; मात्र लेणी आमच्या पूर्वजांनी घडवली आहेत, ते सत्य आहे. त्यामुळे त्यांचा अवमान करणे कुणालाही आवडणार नाही. -रणजित सावरकर, कार्याध्यक्ष-स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक.

पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या मंदिरांमध्ये पुजा होत नाही. पण, पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या मशिदींमध्ये नमाजपठण होते. पुरातत्व विभागाच्या अखत्यारित हिंदुंची जेवढी धार्मिक ठिकाणे आहेत, त्या ठिकाणी पुजाअर्चा चालू करण्यासाठी अनुमती मिळावी. तसेच तेथे पादत्राणे घालून प्रवेश करण्यावर बंदी घालावी, अशी आमची आहे. -सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक-सुदर्शन वाहिनी.
 
घारापुरी लेणी शिवाचे स्थान आहे. त्यामुळे घारापुरी गुंफा सोमवारी बंद असू नये, अशी मागणी आम्ही यापूर्वीच ‘भारतीय पुरातत्व विभाग'कडे केली आहे. येथील शिवमंदिरात पुजन करता यावे यासाठी आम्ही शासनाकडे मागणी केली आहे. -बळीराम ठाकूर, उपसरपंच-घारापुरी ग्रामपंचायत. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अवैध गोदामांमुळे औद्योगिक वसाहत आगीच्या ज्वाळांवर?