दिघा रेल्वे स्थानकातही लोकल थांबणार
‘उरण लोकल'ला १० दिवसात ग्रीन सिग्नल
नवी मुंबई ः नवी मुंबईकर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून नेरुळ-उरण लोकल सेवा सुरु करण्यासह ट्रान्स-हार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकात लोकलला थांबा देण्यात येणार आहे. नवी मुंबईमधील बहुप्रतिक्षीत नेरुळ-उरण लोकल मधून तर ट्रान्स-हार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकातून प्रवास करण्याचे रेल्वे प्रवाशांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. नेरुळ/बेलापूर-खारकोपर-उरण मार्ग आणि दिघा रेल्वे स्थानकाचा प्रवासी वापर येत्या १० दिवसांत सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी दिली आहे.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बेठकीमध्ये काम पूर्ण होऊन काही कारणांमुळे सुरु न झालेल्या रेल्वे प्रकल्पांचा आढावा घ्ोण्यात आला. त्यावेळी नेरुळ-खारकोपर-उरण रेल्वे मार्गातील काही अडचणी दूर करुन सदर मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यासाठी राज्य सरकारशी चर्चा झाली असल्याचे ‘रेल्वे'च्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाच्या पायाभूत सुविधा आणि प्रकल्प निरीक्षण विभागाने राज्यातील सर्वाधिक विलंबित रेल्वे प्रकल्प म्हणून नेरुळ/बेलापूर-खारकोपर-उरण मार्ग असल्याचे जाहीर केले आहे. मार्च १९९७ मध्ये नेरुळ-उरण प्रकल्पासाठी ४९५ कोटींचा प्रारंभिक खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. तसेच सदर प्रकल्प मार्च २००४ मध्ये प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, विविध कारणांमुळे नेरुळ-उरण प्रकल्प रखडल्यामुळे या प्रकल्पाचा खर्च सध्या १,७८२ कोटींवर पोहोचला आहे, असे ‘रेल्वे'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्याअनुषंगाने दीर्घकाळ रखडलेला प्रकल्प नेरुळ/बेलापूर-खारकोपर आणि खारकोपर-उरण अशा दोन टप्प्यांत पूर्ण करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घ्ोतला. यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात नेरुळ/बेलापूर-खारकोपर अशी लोकलसेवा सुरु करण्यात आली. नेरुळ/बेलापूर-खारकोपर यादरम्यान दिवसाला एकूण ४० फेऱ्या चालवण्यात येत आहेत. नेरुळ-बेलापूर-खारकोपर-उरण असा दुहेरी रेल्वे प्रकल्प असून या मार्गिकेची लांबी २६.७ कि.मी. आहे. बेलापूर/नेरुळ ते खारकोपर असा १२.४ कि.मी.चा पहिला टप्पा आहे. त्यापुढे खारकोपर ते उरण १४.३ कि.मी.चा दुसरा टप्पा आहे. या दुसऱ्या टप्प्यात गव्हाण, जासई, रांजणपाडा, न्हावाशेवा, द्रोणागिरी आणि उरण स्थानकांचा समावेश आहे.
दिघा स्थानकात सर्व लोकलला थांबा !
दुसरीकडे ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे ते ऐरोली स्थानकादरम्यान उभारण्यात आलेल्या दिघा रेल्वे स्थानकात देखील लवकरच लोकलला थांबा देण्यात येणार असल्याचे संव्ोÀत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने दिघा रेल्वे स्थानक लवकरच प्रवाशांसाठी खुले होणार असून ट्रान्स-हार्बर मार्गावरील सर्व लोकल या स्थानकांत थांबणार आहेत. त्यामुळे दिघा रेल्वे स्थानकातून आता प्रवास करता येणार आहे.
एमयुटीपी-३ मधील नवीन कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्पाचा पहिला टप्पा दिघा स्थानक आहे. परंतु, कळवा स्थानक परिसरातील सुमारे ७०० प्रकल्पबाधितांनी पर्यायी जागेस जाण्यास नकार दिल्याने कळवा-ऐरोली उन्नत मार्ग सद्यस्थितीत रखडला आहे.