शासनाकडून सर्वसामान्यांच्या जीवनात बदल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : शासन आपल्या दारी उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणे, या योजनेचे उद्दिष्ट आहे. आमचे सरकार गोरगरीबांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असून त्यांना न्याय देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी'च्या माध्यमातून थेट योजनाच लाभार्थ्यांपर्यंत आणण्यासाठी सदर कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राज्यभर घेतला. १५ एप्रिल २०२३ पासून ‘शासन आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यात एकूण ४५,४२,६७३ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला असून त्यात नव्याने २०,२९६ लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात येणार आहेत. म्हणूनच सरकार सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे सर्वसामान्यांचे सरकार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण येथे केले.
‘शासन आपल्या दारी' उपक्रमाचे आयोजन कल्याण-शिळफाटा रोडवरील कोळे मधील प्रीमियर मैदान येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार निरंजन डावखरे, आमदार किसन कथोरे, आमदार संजय केळकर, आमदार कुमार आयलानी, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार शांताराम मोरे, आमदार गीता जैन, आमदार मनिषा कायंदे, आमदार राजू पाटील, माजी आमदार रविंद्र फाटक, ‘एमएमआरडीए'चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, सर्व महापालिकांचे आयुक्त, ‘जिल्हा परिषद'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातील शासन आपल्या दारी उपक्रमाचे मुख्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे, विकास आवटी, मंगेश चिवटे, आदि उपस्थित होते.
यावेळी विविध लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरुपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते शासकीय योजनांचे लाभ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मुंबई मेट्रो-१२ (कल्याण ते तळोजा) प्रकल्प कामाचा ई-शुभारंभ आणि कल्याण पश्चिम उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ई-उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाले.
शासन गरजू लाभार्थ्यांना त्यांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहोचविणारे शासन आहे. शासनाच्या आवाहनानंतर जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी जोमाने कामाला लागले. शेतकरी, सर्वसामान्य माणूस, गरजू, वंचित अशा सर्वांना लाभ देण्यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न सुरु झाले. वैयक्तिक लाभाबरोबरच सामुहिक लाभ आणि वेगवेगळे मोठे मोठे प्रकल्प सुरु करण्यासाठी युध्दपातळीवर कार्यवाही सुरु झाली. यातून समृध्दी महामार्ग, अटल सेतू, मेट्रो अशा विविध कामांचे उद्घाटन करून महाराष्ट्र विकासकामांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आणला. ‘स्वच्छता'मध्ये महाराष्ट्राला क्रमांक एकचा पुरस्कार मिळाला. ‘डीप क्लीन ड्राईव्ह'च्या माध्यमातून अतिशय चांगले काम होत आहे. सरकार दिलेला शब्द पाळणारे सरकार आहे, यातूनच ‘मराठा आरक्षण'चाही प्रश्न निकाली काढला. ‘महिला सक्षमीकरण'साठी शासन सर्व प्रकारे प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या मोठ्या पाठबळामुळे राज्याचा विकास चौफेर होतोय वेगवान होत आहे. बेरोजगारांनाही बळ देण्यासाठी शासन आता ठाणे जिल्ह्यातही ६ आणि ७ मार्च रोजी ‘नमो महा रोजगार मेळावा'चे घेत आहे. या ‘रोजगार मेळावा'मध्ये गरजू, बेरोजगार युवकांना जागेवरच नोकरी दिली जाणार आहे. त्याचा लाभ जास्तीत जास्त युवक युवतींनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.
शासन आपल्या दारी उपक्रम एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात पहिल्यांदाच सुरु झाला. सामान्य माणसाला आपल्या कामासाठी सरकारी कार्यालयात सतत जावे लागायचे. आता सरकारी अधिकारी सामान्य जनतेकडे जातो. यापूर्वी असे झाले नाही. एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रास्ताविकातून सांगितले. यावेळी ना. रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही मनोगत व्यवत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी केले.