ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
एपीएमसी फळ मार्केटमध्ये परदेशी फळांना वाढती मागणी
वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ मार्केटमध्ये देशी फळांसह परदेशातील फळांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार वेगवेगळ्या प्रकारची फळे विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. विशेष म्हणजे बाजारात येणारी परदेशी फळे ग्राहकांसाठी खास आकर्षणाचा विषय ठरत आहेत. देश-परदेशांतून येणाऱ्या फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आरोग्यास पोषक असणारी फळे खरेदी करण्यासाठी ग्राहक एपीएमसी फळ मार्केटमध्ये गर्दी करीत आहेत.
फळांमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे दररोज फळे खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले गेले आहे. फळांमध्येही सध्या नेहमीपेक्षा वेगळी असणारी, परदेशातील फळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. भारतीय फळांप्रमाणेच परदेशी फळांना ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळे किंमत अधिक असूनही परदेशी फळांनाही बाजारात चांगली मागणी वाढत आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी राहावे, यासाठी हल्ली प्रत्येक व्यवती व्यायाम करण्यासह स्वतःच्या आहाराचीही पुरेपूर काळजी घेताना दिसत आहे. यामुळेच प्रत्येकाच्या डाएटमध्ये फळे-भाज्यांचा समावेश वाढला आहे. घरासह-ऑफिस मधील कामामुळे दिवसभरात कितीही धावपळ झाली तरीही हल्ली प्रत्येकजण खाण्यापाण्याच्या वेळा कटाक्षाने पाळत आहे. यामध्येही नैसर्गिक खाद्यपदार्थांद्वारे आरोग्यास जीवनसत्त्वांचा पुरवठा व्हावा, यासाठी फळांचे सेवन करण्यावर फिटनेस फ्रीक मंडळी भर देत आहेत. त्यामुळेच फळांची मागणी वाढत आहे. यात इराणी सफरचंद, इजिप्त संत्री, पॅकम पेर, रासबेरी तर टर्की मधील गुणकारी फणस आदी फळे बाजारामध्ये आली आहेत. मधुमेहग्रस्तांसाठी फणस फायदेशीर असल्याने परदेशी फणसाला मोठी मागणी आहे, असे एपीएमसी फळ मार्केट मधील व्यापाऱ्यांनी सांगितले.
संत्री, मोसंबी, पपई, पेरु, चिकू, टरबूज, कलिंगड, केळी, सफरचंद आदी फळे बाजारात वर्षभर उपलब्ध असतात. सदर फळे राज्यातीलच असल्याने त्यांच्या किमतीही बऱ्यापैकी कमी असतात. मात्र, या फळांपाठोपाठ गेल्या काही वर्षांंपासून परदेशी फळांनी बाजारपेठ चांगलीच काबीज करण्यास सुरुवात केली आहे. परदेशी फळांना बाजारात चांगलीच मागणी असून, ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे एपीएमसी फळ बाजारात सध्या परदेशी फळांची मागणी अधिक आहे.
एपीएमसी फळ मार्केटमधील फळांच्या किंमती
इराणी सफरचंद ः ११० रुपये ते १३० रुपये प्रतिकिलो
टर्की, वॉशिंग्टन सफरचंद : १८० ते २२० रुपये प्रतिकिलो
पेर : १२० ते १४० रुपये प्रतिकिलो
चिली लाल द्राक्षे : ४०० रुपये प्रतिकिलो
इजिप्त संत्री : ८० रुपये प्रतिकिलो
संत्री : ३० ते ४५ रुपये प्रतिकिलो
पेरु : ४० ते ५५ रुपये प्रतिकिलो
पपई :२५ ते ३५ रुपये प्रतिकिलो
मोसंबी : ४० ते ५० रुपये प्रतिकिलो
चिकू : २० ते २५ रुपये प्रतिकिलो
डाळिंब : ८० ते १३० रुपये प्रतिकिलो
पेर : १५० ते १८० रुपये प्रतिकिलो
द्राक्षे : ६० ते ८० रुपये प्रतिकिलो
काळी द्राक्षे : ६० ते ८० रुपये प्रतिकिलो
कलिंगड :१८ ते २५ रुपये प्रतिकिलो
अंजीर : ८० रुपये प्रतिकिलो