वाशीत शिवकालीन शस्त्रास्त्रे पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड
नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भरविण्यात आलेले शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन पाहण्यासाठी नवी मुंबईकरांची एकच झुंबड उडाली आहे. हे प्रदर्शन उद्यापर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या ठिकाणी उद्या सकाळपासून सायंकाळपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या तिथीनुसार जयंती सर्वत्र साजरी होत आहे. त्यानिमित्त शिव फाऊंडेशनच्या वतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भरविण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपशहरप्रमुख संदीप पवार, विभागप्रमुख विजय चांदोरकर आदी उपस्थित होते. ही शिवकालीन शस्त्रे कोणकोणत्या लढायांमध्ये वापरली गेली आणि ती केंव्हापासून अस्तित्वात होती, याचीही माहिती यावेळी नागरिकांना देण्यात आली.
रंग महाराष्ट्राचा...
शिवजयंतीनिमित्त उद्या शिवाजी महाराज चौकात विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. सकाळी १० वाजता महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाणार आहे. त्यानंतर रायगडावरून आलेल्या शिवज्योतीचे स्वागत होणार आहे. यावेळी ढोलताशांच्या पथकांकडून मानवंदना देण्यात येणार आहे. सायंकाळी ६ ते ८च्या दरम्यान ‘रंग महाराष्ट्राचा’ हा शिवचरित्रावरील कार्यक्रम पार पडणार आहे.