धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध

ठाणे : सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय अथवा संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत येत्या ६ जून २०२४ पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश ठाणे जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी लागू केले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करता निवडणूक कार्यक्रम १६ मार्च २०२४ रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने ठाणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून ठाणे जिल्हा दंडाधिकारी /उपविभागीय दंडाधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध घालणे आवश्यक असल्याने तसेच सर्व संबंधितांना नोटीस देवून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यःस्थितीत शक्य नसल्याने तसेच एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याने  ठाणे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील कलम १४४ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय अथवा संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ६ जून २०२४ पर्यंत निर्बंध घालण्याबाबत आदेश दिले आहेत.

रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत फिरत्या वाहनावर ध्वनीक्षेपकास निर्बंध
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे निवडणूक लढविणारे उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी त्यांच्या वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदूषण होण्याची, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस आणि स्वास्थ्यास बाधा पोहोचण्याची तसेच रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता असल्यामुळे ठाणे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी, मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३३ (एन) अन्वये प्राप्त अधिकारानुसार निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही, सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजल्यानंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर आणि कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही, दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, ध्वनीक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल, सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाच्या वापरासंबंधित घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील, याप्रमाणे निर्बंध घातले  आहेत. सदर आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ६ जून २००२४ पर्यंत अंमलात राहणार आहेत. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मतदान ओळखपत्र नसल्यास आधारकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, पॅनकार्ड यांचा पर्याय