‘शिवराज्याभिषेक सोहळा'साठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज

पनवेल : शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे दुर्गराज रायगड येथे तारखेनुसार ६ जून आणि तिथीनुसार २० जून रोजी आयोजन करण्यात येणार आहे. गतवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पूर्ण झाल्याने येथील कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांची लाखोच्या संख्येने उपस्थिती होती. यंदा होणाऱ्या कार्यक्रमांची पूर्वतयारी करताना संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. 

‘रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळा-२०२४'च्या अनुषंगाने नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी जावळे बोलत होते. सदर बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, ‘जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बस्तेवाड, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन. आर. नामदे, ‘राष्ट्रीय महामार्ग'चे कार्यकारी अभियंता दिलीप चौरे, पोलीस उपअधीक्षक एस. बी. काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवमाने, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी देवकाते यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक रायगड येथे येत असतात.  यावर्षी होणाऱ्या सोहळा कार्यक्रमांसाठी आयोजकांकडून तयारी केली जात आहे. मागील वर्षी १५ हजार व्यक्तींची क्षमता असलेल्या गडावर अडीच लाखापेक्षा जास्त जण आल्यामुळे सुरक्षा आणि पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला होता. सदरचा अनुभव लक्षात घेऊन या वर्षी कोणतीही समस्या उद्‌भवू नये या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी  पूर्वतयारी केली जावी. येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी सूक्ष्म नियोजन करुन कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुचित केले.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी महाड आणि माणगांव मार्गे येणाऱ्या खाजगी वाहनांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यांची कामे, पार्किंगच्या जागा आणि तेथून गडाकडे जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था संबंधित विभागांनी पूर्ण करावे. तसेच आवश्यक ते माहिती देणारे फलक लावले जावेत, असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी बास्तेवाड यांनी गडावर नागरिकांच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन, औषधे डॉक्टर्स तसेच आरोग्य कर्मचारी यासाठी करावयाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.

मागील वर्षी झालेला सोहळ्याबाबत केलेली कार्यवाही आणि यंदाच्या पूर्वतयारी बाबत विविध प्रमुख अधिकाऱ्यांनी माहिती सादर केली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी जावळे आणि उपस्थित सर्व अधिकारी यांनी रायगड किल्ल्याची पाहणी केली. तसेच आवश्यक तयारीच्या अनुषंगाने त्यांनी संबंधित यंत्रणाना निर्देश दिले.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 हार्डवेअर दुकानाला आग