दिवा, मुंब्रा, कळवा, माजिवडा-मानपाडा मधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

ठाणे : ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि प्रभाग समिती यांच्याद्वारे ११ जानेवारी रोजी संयुक्तपणे करण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईत दिवा मधील ७, मुंब्रा येथील २, कळवा मधील २ आणि माजिवडा-मानपाडा भागातील २ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासह दिवा भागातील एकूण १९ अनधिकृत नळजोडण्या मुख्य जलवाहिनी पासून तोडण्याची कारवाई करण्यात आली.

ठाणे महापालिका क्षेत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकामांच्या विरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामे पूर्णपणे निष्कासित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत.

दिवा मधील एम. एस. कम्पाऊंड - डीपी रस्ता भागातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील तर दुसऱ्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील कॉलम पाडण्यात आले. दिवा पूर्व श्लोक नगर येथे सहा मजल्यांच्या अंशतः व्याप्त असलेल्या इमारतीचा तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब तोडण्यात आला. तसेच, जिनेही पाडण्यात आले. याच भागात आरती अपार्टमेंट समोरील अनधिकृत इमारतीच्या तळमजल्यावरील गाळे तोडण्यात आले. सीताराम पाटील नगर येथील काही प्रमाणात व्याप्त असलेल्या सहा मजल्याच्या अनधिकृत इमारतीचे जिने तोडण्यात आले. तसेच सेंट मेरी शाळेजवळील अनधिकृत पायलिंग तोडण्यात आले.

मुंब्रा येथील राणा नगर भागात अनधिकृत चौथरा, खांब काढण्यात आला. तन्वर नगर कॉम्प्लेक्स मधील तळ आणि एक मजल्याचे आरसीसी बांधकाम पूर्णपणे काढण्यात आले.
कळवा येथील कुंभार आळी भागातील तळ मजल्याचे आरसीसी स्लॅब आणि दुसऱ्या मजल्याच्या स्लॅबसाठी उभारण्यात आलेले सेंट्रीग आणि स्टीलचे बांधकाम पाडण्यात आले. विटावा खाडीजवळील तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याचे स्लॅब तसेच चौथ्या मजल्याचे अंतर्गत वीट बांधकाम तोडण्यात आले.

अतिक्रमण विरोधी कारवाईत माजिवडा गावातील इमारतीचे दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील आरसीसी स्लॅब, कॉलम तोडण्यात आले. तसेच, ओवळा नाका येथील चार अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करण्यात आली.

 १९ अनधिकृत नळजोडण्या खंडीत
        दिवा येथील श्लोक नगर, शास्त्री नगर, अंश नगर येथील एकूण १९ अनधिकृत नळ जोडण्या मुख्य जलवाहिनी पासून तोडण्याची कारवाई करण्यासह पाणी पुरवठा विभागाने दोन मोटर पंप, ‘२५ एमएम'चे ६० मीटर लांबीचे ८ पाईप जप्त केले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका शिक्षण विभागाचा हलगर्जीपणा उघड