मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
शाळांमधून मतदानाविषयी जनजागृती
नवी मुंबई : २५-ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी येत्या २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीवेळी मतदार जागृतीसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या विविध जनजागृतीपर उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. यासोबतच मुलांमार्फत पालकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यामध्ये आईबाबांस मतदान करण्याविषयीचे पत्रलेखन, मतदानाचा संदेश प्रसारित करणारी चित्रकला आणि रांगोळी रेखाटन, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंधलेखन, गायन, प्रभातफेरी, पथनाटय असे नानाविध उपक्रम राबविण्यात आले. याशिवाय शाळांमध्ये पालकसभा आयोजित करुन त्याठिकाणीही पालकांना मतदानाचे महत्व विशद करीत लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमांच्या माध्यमातून शाळा आणि त्यालगतच्या परिसरातील नागरिकांचेही प्रबोधन करण्याचा प्रयत्न शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळा-शाळांतील विद्यार्थ्यांनी केला.
सदर नानाविध उपक्रम महापालिका शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील १७४ शाळा आणि ३९ कनिष्ठ महाविद्यालये याठिकाणी बेलापूर, शिरवणे, तुर्भे आणि वाशी या केंद्रांचे केंद्र समन्वयक रेखा पाटील, सागरनाथ भंडारी, जयमाला पाटील आणि प्रशांत म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.