‘परकाव्यवाचन स्पर्धा'द्वारे मराठीतील समृध्द काव्यपरंपरेचे दर्शन

नवी मुंबई : मराठी कवितेला अतिशय समृध्द अशी परंपरा असून त्याचे मनोहारी दर्शन नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचारीवृंदाने ‘परकाव्यवाचन स्पर्धा'द्वारे घडविले. यामध्ये प्रत्येकाने आपल्या आवडत्या कवितेचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे प्रत्येक स्पर्धकाची निवड वेगळी होती. स्पर्धेत सादर करण्यासाठी कविता निवडताना कर्मचाऱ्यांना अनेक कवितांचे वाचन करावे लागले असेल. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून मराठी कवितेचे वैभव कर्मचाऱ्यांनी अनुभवले, हेच या स्पर्धेचे यश असल्याचे मत स्पर्धा परीक्षणानंतर परीक्षक, कवी मोहन काळे यांनी व्यक्त केले.

यावेळी ‘घनकचरा व्यवस्थापन विभाग'चे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या हस्ते परीक्षकांचा सत्कार करण्यात आला.

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा'चे औचित्य साधून १४ ते २८ जानेवारी या कालावधीत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मराठी भाषेचा गौरव वाढविणारे तसेच भाषेची आवड निर्माण करणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यामध्ये ‘परकाव्यवाचन स्पर्धा' असा एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यात महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या आवडत्या कवितेचे सादरीकरण करणे अपेक्षित होते.

त्यानुसार ३२ कर्मचाऱ्यांनी ‘स्पर्धा'मध्ये सहभागी होत आपल्या आवडत्या कवीची पसंतीची कविता सादर केली. संत, पंत, तंत काव्यापासून ते आधुनिक कवितेपर्यंतचा प्रवास या सादरीकरणातून उलगडला. विशेष म्हणजे स्पर्धा असूनही इतरांच्या सादरीकरणाला कर्मचारी रसिक म्हणून उत्स्फुर्त दाद देत होते. त्यामुळे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ‘परकाव्यवाचन स्पर्धा' पार पडली. कवितांना मिळणारी दाद मान्यवर कवींच्या कवितेतील शब्दकळेला होतीच, तितकीच ती कविता सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सादरीकरणालाही होती, असे निरीक्षण कवी मोहन काळे यांनी आपल्या मनोगतात नोंदविले. त्यांनीही काही मान्यवर कवींच्या कवितांचे सादरीकरण केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महापालिका इतर कोणत्याही शासकीय संस्थांपेक्षी अत्यंत वेगळे आणि अभिनव उपक्रम राबवित असून विशेष म्हणजे त्यामध्ये अधिकारी, कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. ती निश्चितच कौतुक करण्यासारखी आणि समाधान देणारी गोष्ट असल्याचेही मोहन काळे म्हणाले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मराठा सेवा संघाच्या ऐरोली येथील सभागृहाचे उद्घाटन