‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान'ला प्रारंभ
ठाणे : ‘जागतिक पर्यावरण दिन' निमित्त ठाणे महापालिकाने ‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान' हाती घेतले आहे. या ‘अभियान'मध्ये १५ ऑगस्ट पर्यंत महापालिका क्षेत्रात १ लाख झाडे लावण्यात येणार असून ‘अभियान'चा प्रारंभ ५ जून रोजी पोखरण रस्ता क्र.१, कॅडबरी जंक्शन येथे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बकुळीचे झाड लावून केला.
५ जून पासून १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत ठाणे महापालिका हद्दीत १ लाख झाडे लावण्याचे ‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान' हाती घेण्यात आले आहे. त्याची सुरुवात महापालिका क्षेत्रात वृक्ष प्राधिकरण, खाजगी संस्था यांच्या माध्यमातून सुमारे ५,००० झाडे लावून करण्यात आली आहे. सदर ‘अभियान'मध्ये जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
महापालिका देणार विनामुल्य झाडे...
बांबू तसेच स्थानिक प्रजातींच्या झाडांना या वृक्षारोपण ‘अभियान'मध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. महापालिका यासाठी विनामुल्य झाडे उपलब्ध करून देणार आहे. महापालिकेच्या जागांबरोबरच सर्व शासकीय संस्था, निमशासकीय संस्था, शासनाचे सर्व विभाग, संरक्षण दल, खाजगी कार्यालये, गृहसंकुले, स्वयंसेवी संस्था, धर्मादाय संस्था यांनी जागा उपलब्ध करुन द्यावी. रोपांची मागणीही नोंदवावी. या सर्वांच्या सहकार्याने ‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान' यशस्वी करु, असा विश्वास आयुक्त राव यांनी व्यक्त केला.
बांबूच्या लागवडीस प्राधान्य...
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तसेच ‘वन विभाग'कडे वनीकरणासाठी जागा उपलब्ध असल्यास त्यांच्या सहकार्याने महापालिका अभियान राबवेल. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात बांबूच्या लागवडीलाही प्राधान्य दिले जाणार असल्याची माहितीही आयुक्त राव यांनी दिली.
विभागप्रमुखांकडे पालकत्व...
सदर ‘अभियान'मध्ये एकेका विभागाचे पालकत्व महापालिकेच्या एकेक विभागप्रमुखाकडे दिले जाणार आहे. ‘अभियान'चे संयोजन ‘वृक्ष प्राधिकरण विभाग'कडून होईल. मात्र, त्याच्यावर देखरेख ठेवणे, ठराविक काळाने झाडांच्या संगोपनाचा आढावा घेणे अशी कामे विभाग प्रमुख करतील. त्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विभागास पुढील वर्षी जागतिक पर्यावरण दिनी गौरविण्यात येईल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
नागला बंदर येथे मियावाकी वन...
नागला बंदर चौपाटी येथे मियावाकी पध्दतीने झाडे लावण्यात आली. कमी जागेत, कमी कालावधीत जंगल तयार करण्याची मियावाकी वृक्षारोपण पध्दत असून जैवविविधता संवर्धनासाठी ती उपयुक्त आहे. या वृक्षारोपणात पळस, बेल, नीम, कांचन, सिताअशोक, जांभूळ, पारिजातक, शिसम, कोकम, शिवण, करंज, अडुळसा, तगर, लिंबू, कामिनी, बकुळ, आदि देशी वृक्षांचा समावेश आहे. उपायुक्त सचिन पवार आणि वृक्ष अधिक्षक केदार पाटील यांनी येथे वृक्षारोपण केले.
दरम्यान, पोखरण रस्ता क्र.१ येथे रस्त्याच्या दुतर्फा पारंपरिक पध्दतीने वृक्षारोपण करण्यात येत आहे. त्यासाठी बकुळाची झाडे लावण्यात आली. ‘वृक्ष प्राधिकरण'चे अधीक्षक केदार पाटील यांनी यावेळी रस्त्याच्या दुतर्फा करण्यात येत असलेले वृक्षारोपण, त्यासाठी निवडण्यात आलेली झाडे यांची माहिती उपस्थितांना दिली. आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते कॅडबरी कंपनीलगतच्या फुटपाथच्या कडेने वृक्षारोपण करण्यात आले. त्यांच्यासह अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (उद्यान विभाग) सचिन पवार, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, उपायुक्त (पर्यावरण विभाग) अनघा कदम, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, उपनगर अभियंता (विद्युत) शुभांगी केसवानी, सहाय्यक आयुक्त रंजू पवार, सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे आदिंनी वृक्षारोपणात सहभाग घेतला.