नेरुळ विभागात पोलिसांचे काेंबींग ऑपरेशन  

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबींग ऑपरेशन राबवून गांजा बाळगाणाऱ्यासह ३ बांग्लादेशी नागरिक तसेच हद्दपार केलेला गुन्हेगार अशा एकूण ५ जणांची धरपडक पोलिसांनी केली. त्याशिवाय पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपी, पाहिजे आरोपी, गुंड, हिस्ट्रीशीटर, संशयित व्यक्तींची तपासणी करुन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे नेरुळ परिसरात वावरणाऱ्या गुन्हेगारांचे तसेच अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.  
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने नवी मुंबई पोलिसांनी रेकॉर्ड वरील आरोपी, पाहिजे आरोपी, गुंड, हिस्ट्रीसीटर तसेच अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांची झाडाझडती सुरु केली आहे. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या भागामध्ये कोंबींग ऑपरेशन राबवून गुन्हेगार आणि बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. ४ एप्रिल रोजी रात्री नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबींग ऑपरेशन राबविण्यात आले. यासाठी पोलीस आयुक्तालयातील इतर पोलीस ठाण्यातील अतिरिक्त मनुष्यबळ तसेच राईट कंट्रोल पोलीस पथक मागवून २१ पोलीस अधिकारी आणि ९६ पोलीस अंमलदार यांची १४ तुकड्यांमध्ये विभागणी करण्यात आली.  

त्यानंतर पोलिसांनी कोंबींग ऑपरेशन राबवून बालाजी टेकडी परिसरातील झोपडपट्टी मधून मंगेश प्रकाश बोटले (३२) याला ९ हजार किंमतीच्या ८७४ ग्रॅम गांजासह पकडले. त्याचप्रमाणे दारावे गांव, सेक्टर-२३ मधील समर्थ कृपा बिल्डींग मध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या जाफर सलाम काझी (३५), हवा बेगम जाफर काझी (३०), नाजमुल सलाम काझी (२५) या तीन बांग्लादेश नागरिकांची देखील धरपकड केली. या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान नेरुळच्या एलपी ब्रिजखाली २ वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला अभिलेखावरील बोनी शंकर सांळुखे (२५) हा तडीपार व्यक्ती पोलिसांच्या हाती लागला.  

या कारवाई दरम्यान दारु बाळणाऱ्या ३ तसेच दारुचे सेवन करणारे १४ अशा एकूण १७ व्यक्तींविरोधात पोलिसांनी कारवाई केली. त्याचप्रमाणे अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या ११ व्यक्तींविरोधात देखील कारवाई करण्यात आली. तसेच नेरुळ पोलीस ठाणेच्या हद्दीत ४ ठिकाणी लावण्यात आलेल्या नाकांबदीदरम्यान पोलिसांनी मोटार वाहन कायद्याचे उल्लघंन करणाऱ्या ८० व्यक्तींविरोधात कारवाई करुन त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. सदर कोबिंग ऑपरेशन दरम्यान पाहिजे असलेले २ आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत.  

तसेच बेलेबल वॉरंट आणि नॉन बेलेबल वॉरंट असलेले ३ आरोपी देखील मिळून आले. त्याचप्रमाणे १० संबंधितांना समन्सची बजावणी करण्यात आली. त्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या ७० व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच अभिलेखावरील पाहिजे, फरारी आणि हिस्ट्रीशिटर, गुंड यांची तपासणी करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या निर्देशानुसार परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 वाहतूक नियमांचे उल्लंघन; १३८ बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई