न्हावा शेवा टप्पा-३ मधील पाईपलाईन बदलण्याच्या कामाला लवकरच गती -ना. गुलाबराव पाटील

उरण : भोकरपाडा स्थित असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलशुध्दीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये विषय घेणार असून कामगारांना न्याय देण्याचे आश्वासन राज्याचे पाणी पुरवठा-स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत न्हावा शेवा टप्पा-३ नुसार जुन्या पाईपलाईन बदलण्याच्या कामाला वेग आणणार असल्याचेही ना. पाटील यांनी सांगितले.  

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलशुध्दीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार तर न्हावा शेवा टप्पा-३ नुसार जीर्ण पाईपलाईन लवकरात लवकर बदली करण्याच्या कामाला वेग देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्यानुसार ३० जानेवारी रोजी मंत्रालय येथे पाणी पुरवठा-स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. सदर बैठकीस ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, संबंधित विभागाचे अधिकारी, कामगार नेते जितेंद्र घरत, युवा नेते देविदास पाटील, गणेश आगिवले, महेंद्र पाटील, संभाजी पाटील, आदि उपस्थित होते.

 ‘जीवन प्राधिकरण'चे जलशुध्दीकरण केंद्र पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे असून या केंद्रात गेल्या ३० वर्षापासून वेगवेगळया पदावर अनेक कर्मचारी काम करत आहे. या कामगारांना पगारवाढ तसेच सरकारी नियमानुसार सुट्ट्या आणि इतर सुविधा दिल्या गेल्या नाहीत. त्यामुळे आ. महेश बालदी यांनी सदर कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मागणी करुन त्याचा पाठपुरावा कायम ठेवला आहे. उच्च न्यायालयामध्ये देखील सन २००७ मध्ये निकाल दिला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कामगार मंत्रालय यांनी ६ महिन्यात निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांची देणी अदा करावीत, असे आदेश दिले होते. परंतु, ‘जीवन प्राधिकरण'ने कोणतीही कार्यवाही केली नाही.

याबाबत २२ नोव्हेंबर २०२२ रोजी ना. गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक होऊन कामगारांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या. मात्र, मुख्य मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्या अनुषंगाने ना. गुलाबराव पाटील, संबंधीत विभागाचे अधिकारी आणि कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी आमदार बालदी यांनी कामगारांच्या व्यथा मांडताना तातडीने कार्यवाही करण्याची आग्रही मागणी केली. त्यावर ना. गुलाबराव पाटील यांनी कामगारांच्या पगारवाढीसंदर्भात तसेच सुट्ट्यांबाबत बोर्ड मिटींगमध्ये विषय घेणार असून चतुर्थ श्रेणी कामगारांप्रमाणे पगारवाढ करण्याचे आश्वासन दिले. तसेच सकारात्मक भूमिका घेऊन कामगारांना न्याय देण्याचे आणि सर्वोत्तपरी सहकार्य करण्याचे त्यांन आश्वासन दिले.

दुसरीकडे ‘जीवन प्राधिकरण'चा महत्वाचा भाग असलेल्या न्हावा शेवा टप्पा-३च्या कामानंतर पनवेल आणि उरण परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होणार आहे. वाढते नागरीकरण आणि पाण्याची आवश्यकता लक्षात घेता या योजनेतील जुन्या पाईपलाईन बदलण्याच्या कामाला वेग येण्याची गरज असल्याचे आ. प्रशांत ठाकूर यांनी ना. गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार ठेकेदाराला सदरचे काम फास्ट ट्रॅकवर करण्याचे आदेश देण्याचे ना. पाटील यांनी आश्वासित केले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भूमिपुत्रांसाठी लढणाऱ्या नेत्याला भूमिपुत्ररत्न पुरस्कार प्रदान !