ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
निवडणुकीत विरोधक होणार चारीमुंड्या चीत -मुख्यमंत्री
ठाणे : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा ठाणे जिल्हा असून तो धर्मवीर आनंद दिघे यांचाही जिल्हा आहे. धर्मवीरांना साजेसे काम आपल्याला करायचे आहे. बाळासाहेबांचे आशिर्वाद आपल्या पाठिशी आहेत. त्यामुळे ‘महायुती'चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करतील आणि विरोधक चारीमुंड्या चीत होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
‘ठाणे लोकसभा मतदारसंघ'चे ‘महायुती'चे उमेदवार नरेश म्हस्के यांनी ३ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निघालेल्या ‘प्रचार रॅली'ला मुख्यमंत्री शिंदे यांनी संबोधित केले. याप्रसंगी ‘महायुती'चे नेते उपस्थित होते.
नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प लोकांनी केला आहे. ‘तुमचा ठाणेकर' या राज्याचा मुख्यमंत्री आहे. केवळ ठाणे मध्येच नाही तर संपूर्ण राज्यात कधी नव्हे इतकी विकास कामे केली आहेत. आपले सरकार येण्यापूर्वी सणांवर बंदी होती. घरात बसून सरकार चालवता येत नाही. ‘फेसबुक लाईव्ह'ने सरकार चालत नाही, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटावर केली. अहंकारामुळे राज्य अधोगतीला चालले होते. याविरोधात आपण उठाव केला. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचे सरकार आपण स्थापन केले. मागील २ वर्षात राज्यात प्रचंड काम झाले आहे. सदरचे काम मतदारांपर्यंत पोहोचवायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.
‘रॅली'ला झालेली प्रचंड गर्दी पाहता नरेश म्हस्के यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. नरेश म्हस्के यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत आहे. यंदाची निवडणूक विकासाची निवडणूक असून देशाला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना डोळ्यासमोर पराभव दिसत असल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नवी टुम काढली आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर संविधान बदलणार असा आरोप करीत आहेत. मात्र, जोवर चंद्र आणि सूर्य आहेत तोवर बाबासाहेबांचे संविधान कोणी बदलणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान, नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज भरताना नरेश म्हस्के आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ज्येष्ठ नेते आमदार गणेश नाईक, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, आमदार प्रताप सरनाईक, माजी खासदार संजीव नाईक, डॉ. श्रीकांत शिंदे, ‘राष्ट्रवादीी'चे आनंद परांजपे, आमदार रविंद्र फाटक, शिवसेना उपनेते विजय नाहटा, आदिंसह ‘महायुती'मधील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर घटक पक्षांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.