शेजारी बनला भक्षक!

बदलापूर : मशीदमध्ये नमाज पठणासाठी गेलेल्या नऊ वर्षाच्या मुलाचे शेजाऱ्यांंनी अपहरण करुन त्याच्या वडिलांकडे २३ लाख रुपये खंडणीची मागणी केली. यानंतर अपहरणकर्त्यांनी चिमुरड्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदरची घटना अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर-कर्जत मार्गावर असलेल्या गोरेगाव येथे घडली आहे. या प्रकरणी कुळगाव ग्रामीण पोलिसांनी अपहरण, खंडणी आणि हत्येचा गुन्हा दाखल करुन सदरचे भयानक कृत करणाऱ्या दोघा भावांसह त्यांच्या कुटुंबातील ६ जणांना ३ तासातच गजाआड केले आहे. सलमान मौलवी आणि त्याचा भाऊ सफुआन मौलवी अशी अटक करण्यात आलेल्या दोघा भावांची नावे आहे. तर इबाद बुबेरे असे अपहरण करुन खंडणीसाठी हत्या झालेल्या ९ वर्षाच्या चिमुकल्याचे नाव आहे.

मृतक इबाद बुबेरे कुटुंबासह अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर-कर्जत मार्गावर असलेल्या गोरेगाव येथे राहत होता. तर त्याच्या शेजारीच आरोपी सलमान, सफुआन कुटूंबासह राहत असून सलमान बदलापूर मधील गॅरेजवर तर आरोपी दुसरा भाऊ वाईंडींगचे काम करतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीच्या घराचे नव्याने उभारण्याचे काम सुरु असल्याने त्यासाठी त्यांना पैशाची गरज होती. पैशांसाठी सलमान मौलवी आणि सफुआन मौलवी या दोघांनी २४ मार्च रोजी सायंकाळचा रोजा खोलून मशिदीत नमाज पठणासाठी गेलेला ९ वर्षीय इबाद बुबेरे रात्री ९ च्या सुमारास बेपत्ता झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्याचे नातेवाईक आणि गावातील तरुण त्याचा शोध घेत असतानाच, त्याचे वडील  मुद्दसीर  बुबेरे यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यवती कॉल करुन तुमचा मुलगा तुम्हाला जिवंत हवा असल्यास त्या बदल्यास २३ लाख रुपये द्या, अशी खंडणीसाठी धमकी देऊन फोन बंद झाला.

यानंतर अपहृत इबाद बुबेरे याचे वडील मुद्दीसीर याने सदर प्रकाराची माहिती कुळगाव पोलिसांना दिली. यावेळी घटनेचे गांभीर्य ओळखून ग्रामीण गुन्हे शाखा आणि स्थानिक ग्रामीण पोलिसांनी तत्काळ तपास सुरु केला. एकीकडे पोलीस तर दुसरीकडे ग्रामस्थ इबादचा शोधत होते. त्याचवेळी अपहरणकर्त्याने मोबाईलमध्ये दुसरे सीम कार्ड टाकून फोन करण्याच्या प्रयत्न करताच  आरोपीचे मोबाईल लोकेशन पोलिसांना कळून आले. यानंतर पोलीस थेट त्याच गावातील फोन करणाऱ्या आरोपी सलमान मौलवी याच्या घरात दाखल झाले. त्यानंतर बेपत्ता असलेल्या इबादचा शोध सुरु केला. त्याचवेळी मध्यरात्रीच्या सुमारास  आरोपीच्या घराच्या मागच्या बाजुला एका खड्ड्यात गोणीमध्ये इबाद याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत इबादचा मृतदेह जे. जे. रुग्णालयात पाठवून दिला.

दुसरीकडे सदर प्रकरणात कुळगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी सलमान, सफुयान यांच्यासह ५ जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात मुख्य आरोपीच्या कुटुंबाचा सहभाग आहे का? याचा तपास तपास पोलिस करीत असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी.  एस.  स्वामी यांनी दिली. तसेच इतरही अंगाने पोलीस तपास करीत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातारण असल्याने तेथे ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर आरोपींच्या गावात राहणाऱ्या इतरही नातेवाईकांना सुरक्षा देण्यात आली आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

शेअर्स खरेदी विक्री ट्रेडिंगच्या नावाखाली 44 लाख 72 हजार रुपये उकळणाऱ्या टोळीतील दुक्कली गजाआड